लातूर जिल्ह्यात कोतवालांची 114 पदे भरणार; 31 जुलैपर्यंत अर्ज सादर करता येणार
लातूर:(जिमाका) दि. 21 - महसूल व वन विभागाच्या 17 मे 2023 रोजीचे पत्र आणि जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या सूचनेनुसार लातूर जिल्ह्यात कोतवाल पदाच्या 114 जागांची पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या पदासाठी 24 जुलै 2023 ते 31 जुलै 2023 या कालावधीत कार्यालयीन वेळेत संबंधित तहसील कार्यालयात अर्ज वितरण करण्यात येणार असून, याच कालावधीत अर्ज स्वीकारले जातील. तसेच 20 ऑगस्ट 2023 रोजी तालुकास्तरावर लेखी परीक्षा होणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी कळविले आहे.
कोतवाल पदभरतीमध्ये 114 पदांपैकी 52 पदे खुल्या संवर्गासाठी असून उर्वरित पदे विविध संवर्गासाठी राखीव राहतील. यामध्ये लातूर तालुक्यातील 15, औसा तालुक्यातील 13, रेणापूर तालुक्यातील 5, अहमदपूर तालुक्यातील 19, चाकूर तालुक्यातील 12, उदगीर तालुक्यातील 20, जळकोट तालुक्यातील 7, निलंगा तालुक्यातील 14, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील 6 आणि देवणी तालुक्यातील 3 पदे भरण्यात येणार आहेत.
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार हा संबंधित तालुक्यातील रहिवासी असणे आवश्यक असून किमान चौथी पास असावा. तसेच त्याला मराठी भाषा लिहिता व वाचता येणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय 31 जुलै 2023 रोजी किमान 18 वर्षे ते कमाल 40 वर्षे असावे. मागासवर्गीय उमेदवारांना 400 रुपये परीक्षा शुल्क राहणार असून खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये परीक्षा शुल्क राहील. हे परीक्षा शुल्क ना-परतावा असेल. परीक्षा शुल्काचा संबंधित तहसीलदार यांच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेचा डी. डी. (डिमांड ड्राफ्ट) अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.
अर्जासोबत महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, प्रमाणपत्र, सनद किंवा टी.सी. यापैकी एक वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, मागासवर्गीय उमेदवार असल्यास जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र, उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्यास नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व्यतिरिक्त), लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (नमुना-अ), ईडब्लूएस प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. कोतवाल पदासाठी लेखी परीक्षेद्वारे गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. परीक्षेबाबतची सविस्तर माहिती लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://latur.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे ढगे यांनी कळविले आहे.
0 Comments