Latest News

6/recent/ticker-posts

तापलेल्या भूमीतील शीतल क्षण

आंतरभारतीची राजस्थान यात्रा, संगीता देशमुख यांच्या लेखणीतून...

तापलेल्या भूमीतील शीतल क्षण

म्हा आंतरभारती परिवाराला उत्सुकता असते ती,मे महिन्याची! मे महिना म्हटलं की,आंतरभारतीची दर्शन यात्रा हा एक आगळावेगळा अनुभव असतो,साठवणीतला आणि आठवणीतला! वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक एकत्र येऊन या यात्रेचा आनंद अक्षरश: लुटतात. दरवर्षी महाराष्ट्राबाहेर   जायचे,तेथील पर्यटन करायचे,पूर्ण तर नाही होणार पण जेवढा शक्य आहे,तेवढा तेथील संस्कृतीचा अभ्यास करणे,वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या सदस्यांसोबत मिळून मिसळून राहणे, आंतरभारतीची उद्दिष्ट्ये साध्य करण्याचा प्रयत्न करणे, अशा अनेक कारणांनी ही यात्रा समृद्ध बनत असते. यावर्षी ही यात्रा राजस्थान मध्ये ठरली होती. राजस्थानमधील उन्हाचा कडाका पाहता ,या यात्रेस सहज कोणी तयार होणे शक्य नव्हते. परंतु आंतरभारती परिवारातील एकमेकांवरील प्रेम, जिव्हाळा आणि या प्रवासाची पुर्वानुभवाची शिदोरी सोबत असल्याने या यात्रेची वेगळी उत्सुकता होती. आपलेच देशबांधव अशा कडक उन्हात कसे जीवन जगतात,हे अनुभवायचे होते. म्हणून उदगीर, वसमत, आंबाजोगाई, पुणे, लातूर, औरंगाबाद, गोवा, मुंबई, लातूर नागपूर, अमरावती, गुजरात, हैद्राबाद, अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून आंतरभारतीचे सदस्य यात सामील झाले होते. आम्ही वसमत समूहातून 27 जण सहभागी झालो होतो. 

8 मेला उत्तररात्री पावणे तीनच्या  दरम्यान हैद्राबाद- जयपूर रेल्वेने निघालो. सकाळचा नास्ता, दुपारचे व रात्रीचे जेवण याचे नियोजन सर्वांनी मिळून घेतले होते. दशम्या, पोळ्या, धपाटे चटण्या,दही,ताक, लाडू, चिवडा, शंकरपाळे, असे पदार्थ एकेकानी वाटण्या करून घेतले होते. प्रवास असा खाण्यात, अंताक्षरी खेळण्यात, गप्पाटप्पात एकदम मजेत गेला. राजस्थान मधील आमचे उतरण्याचे ठिकाण अजमेर  कधी आले,हे देखील कळले नाही. आम्ही लोढा धर्मशाळेत उतरलो.तेथील खोल्या सर्व सुविधांनी परिपूर्ण होत्या. आम्ही सर्वजण  आंतरभारती दिवस साजरा करण्यासाठी तयार झालो.

         10 मे हा सानेगुरुजीनी पंढरपूरच्या  मंदिरात दलितांना  प्रवेशासाठी दिलेल्या लढ्याची यशस्वी सांगता झालेला तसेच यदुनाथ थत्ते यांचा स्मृतिदिवस आंतरभारती दिवस म्हणून दरवर्षीप्रमाणे  साजरा झाला . राष्ट्रीय बैठक, आमसभा, व्याख्यान, सदस्यांचा स्वपरिचय, स्थानिक प्रमुख पाहुण्यांचे मनोगत असा बहुरंगी आणि बहुढंगी कार्यक्रम संपन्न झाला. त्यात स्थानिक आमदार डॉ. बाहेती यांचे मनोगत त्याबरोबर "बलशाली भारत हो" या विषयावर उमेश श्रीवास्तव, संगीता देशमुख,अमर हबीब यांचे व्याख्यान झाले. प्रास्ताविक डॉ.डी .एस. कोरे यांनी तर अध्यक्षीय समारोप पांडुरंग नाडकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन संजयकुमार माचेवार यांनी केले तर आभार मनिषाराणी यांनी मानले. मधुश्री आर्य यांची ज्येष्ठ-श्रेष्ठ उपस्थिती म्हणून सत्कार केला.

अजमेर

दि. 11 मे म्हणजे ज्या दिवसाची प्रचंड प्रतीक्षा होती तो दिवस. सगळेजण तयार होऊन सकाळी 6.वाजताच ख्वाजा गरीब नवाज दर्गाह पाहून आलोत.आपल्या देशात जशी श्रीमंती आहे तसे दारिद्र्यही आहे.सर्वच धार्मिक ठिकाणी  बाहेर  असणारे प्रचंड दारिद्र्य फक्त वेष बदलून  दिसले. तितक्या सकाळी लहान लेकरे,अपंग लोक भीक देण्यासाठी याचना करत होते.ईश्वर - अल्ला चराचरात आहे तर यांना एकवेळच्या जेवणासाठी, आपल्याच दारात एवढे  केवीलवाणे का करतो, या विचाराने आपणच सुन्न होतो. तिथून आल्यानंतर नास्ता करून अजमेर दर्शनासाठी निघालो.रस्त्याने दुतर्फा बाभूळबन.शुष्क रेतीत या बाभळी स्वतःचे अस्तित्व टिकवून होत्या.राजस्थान म्हटलं की,आपल्याला ऊन आठवते.परंतु अजमेर येथे सुंदर असे आणासागर पाहिले. जगातील सात आश्चर्याच्या प्रतिकृती एकाच ठिकाणी पहायला मिळाल्या. 

पुष्कर

तिथून पुष्कर येथे असणारे ब्रह्मदेवाचे एकमेव असणारे मंदिर पाहिले.पुष्कर सरोवर पाहिले. ऊन मी म्हणत होते,पण आमचे फोटोसेशन आणि खरेदीही  मी म्हणत होती. आमचा हा प्रवास हा अत्यंत सुखदायी होण्यामध्ये मोलाचा वाटा असणारे व्यक्तिमत्व म्हणजे आंबाजोगाई येथे वास्तव्यास असणारे परंतु मूळ राजस्थानी असणारे राजू जांगीड. पुष्कर पाहून आम्ही राजू  जांगीड यांच्या रतनास जि. नागोर या गावी गेलो.

रतनास

गाव तस छोटं पण माणसे मात्र खरंच विशाल मनाची. आम्ही कोण कुठले पण आपल्या मुलाची ओळख एवढा एक आंतरीक धागा पकडून त्यांनी आम्हा दीडशे लोकांचे जंगी  स्वागत आणि आदरातिथ्य  केले. त्यांच्या परिवारातील स्त्री - पुरुष, लेकरे अशी 25-30 जण तिथे आमच्या सरबराईसाठी होते. कुलर ,वीज खंडित झाली तर गर्मीत गैरसोय होऊ नये म्हणून जनरेटरसह व्यवस्था केली. राजस्थानी आहार विशेष दाल बाटी, गोड चुरमा, सलाद, बुंदी का रायता, सांगरी असा जेवणाचा जंगी बेत केला.सर्वांनी मन:स्वी आस्वाद घेतला. वाढायला पूनम  (राजू जांगीडची मुलगी) व गावकरी होते. पुनमचा उत्साह कधीच विसरता येणार नाही. तेथील माहिलांशी आम्ही संवाद साधला. त्यांची संस्कृती -परंपरा जाणून घेतली.महिलांचे समाजातील स्थान जवळपास आपल्यासारखेच. ग्रामीण भागात मुलीचे शिक्षण दहावी बारावीच्या पुढे नाही. ग्रामीण भागात स्त्रियांना घुंघट पद्धत सक्तीची आहे. शहरात गेलेल्या स्त्रियाना थोडेफार स्वातंत्र्य आहे. बालविवाह पूर्णतः बंद नाहीत.अगदी गरीब कुटुंबात आजही बालविवाह होतात. हे लोक अत्यंत कष्टाळू आणि मायाळू वाटले. सुरुवातीला त्या स्त्रियांना आमच्यासोबत थोडे वेगळेपणा जाणवला असेल. ते आमच्याकडे आणि आम्ही त्यांच्याकडे पाहून फक्त स्मितहास्य करीत होतो. पण जेव्हा आम्ही त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा आमच्यातील अनोळखेपण गळून गेले. त्यांनी त्यांच्या भाषेतून आमच्या आग्रहाखातर "म्हारा जगजांदी आओ, मेरी सबा मेरे रंग बरसाओ" अशी दोन भक्तीगीत म्हटले. राजू जांगीड यांच्या आईवडीलांना अध्यक्ष पांडुरंग नाडकर्णी व अमर हबीब यांच्या हस्ते एक पुस्तक देऊन कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या परिवाराचे खूप सारे प्रेम घेऊन आम्ही जयपूरकडे प्रयाण केले  जयपूरला रात्री साडे दहा वाजता 'राजस्थान समग्र सेवा संघ' येथे पोहोचलो. तिथे तेथील अध्यक्ष सवाई सिंह यांनी अगदी सेवाभावी वृत्तीने आदरातिथ्य केले.जेवणात रात्री पुरी भाजी,रसगुल्ला दिला.

जयपूर

 दि. 12 मे ला  सकाळी नास्त्यात सुजीचा शिरा, पोहे दिले. तिथे निघण्यापूर्वी कृतज्ञता म्हणून छोटासा कार्यक्रम घेऊन सवाई सिंह यांना गांधीजींचे 'सत्याचे प्रयोग' हे पुस्तक भेट दिले. या आश्रमाचा शिलान्यास जयप्रकाश नारायण यांच्या हस्ते झालेला आहे. तिथे गोकुळभाई भट यांची समाधी आहे. राजस्थानचे गांधीजी म्हणून ते ओळखल्या जातात. समाधीचे दर्शन घेतले. पांडुरंग नाडकर्णी यांनी आभारवजा मनोगत व्यक्त केले. देशभर फिरताना गांधीजी असे जागोजागी भेटतात आणि ऋणानुबंध घट्ट होत जातात. बापू किती मोठी शिदोरी आम्हासाठी सोडून गेले! नंतर आम्ही जयपूर किल्ला पहायला गेलो. जयगढपूर किल्ला, तिथूनच नाहार गढ किल्ल्याची माहिती मिळवली, जो की राण्यांसाठी बांधलेला आहे.तिथून पूर्ण जयपूर शहर दिसते. राजस्थान मधील सर्व राजवाडे ,किल्ले म्हणजे शिल्पकलेचे आणि वास्तुकलेचे अत्युकृष्ट नमुने आहेत.त्यांची भव्य - दिव्यता आपल्याला थक्क करून सोडते. तिथे राजवाडा हॉटेल मध्ये दुपारचे जेवण करण्यास थांबलो. तिथे वेगळे आकर्षण वाटले ते म्हणजे, त्या हॉटेल मध्ये काही स्थानिक कलाकार आपली कला सादर करत येणाऱ्या ग्राहकांचे मनोरंजन करत असतात. तिथे एक मुलगा व त्याचे वडील काही लोकगीते, काही फिल्मी  एकापेक्षा एक सरस असे गाणी ते गात होते. 150 लोकांचे जेवण काही क्षणात आटोपल्यासारखे वाटले. कारण ती गाणी इतकी सुमधुर होती,की तिथून पाय निघत नव्हता. परंतु गुलाबी शहर पाहण्याची ओढ जास्त होती. नंतर जलमहाल, हवामहाल, जंतरमंतर, सिटी पॅलेस, अशी सुंदर व तेवढीच आकर्षक अशी प्रेक्षणीय स्थळे पाहिली. मुख्य शहरातील सर्व इमारती गुलाबी रंगांनी रंगविलेल्या आहेत,असा तिथे पूर्वी दंडक होता,असं ऐकलं. गुलाबी शहराचे हे वैशिष्ट्ये मनाला फार भावले.तिथून सालासरकडे प्रयाण केले.

सालासर

 दि. 13 तारखेला सालासरला सकाळी बालाजी मंदिरात दर्शनाला गेलो. मंदिराच्या परिसरात पुढ पुढ जात असताना लक्षात  आले की,सर्वत्र हनुमानाचे फोटो, मुर्त्या आहेत. तिथे विचारपूस केल्यावर कळले की, तिथे हनुमानाला बालाजी म्हणतात.नंतर नास्ता वगैरे करून देशनोककडे निघालो.

देशनोक

 देशनोक येथील करणी  माता मंदिरात गेलो. करणी माता मंदिर म्हटले की,सर्वांच्या मनात प्रचंड भीती होती कारण तेथील उंदरांचा सुळसुळाट. तेथे काही आख्यायिका ऐकल्या.असं म्हणतात की,ही देवी आईच्या गर्भात 21 महिने होती.तिचं आयुष्य 151 वर्षे,6 महिने,2 दिवस होते.तीचे सर्वच जीवन चमत्कारिक होते म्हणूनच तिला करणी माता म्हणतात.उंदरांना तिथे 'काबा 'म्हणतात. काबा म्हणजे राजस्थानी भाषेत लहान लेकरू. हे उंदीर म्हणजे करणी मातेचे लेकरे आहेत.पूर्ण मंदिरभर, परिसरात आपल्या पायाशी इकडून तिकडे उंदरांचा नुसता धुमाकुळ असतो. आत जाताना खूप भीती वाटते,पण काहीतरी वेगळा अनुभव घ्यायचा म्हणून आम्ही आत गेलोच. बाकी तिची आख्यायिका खरी खोटी  हे माहिती नाही.आपल्याकडे धार्मिकतेबरोबर श्रद्धेपेक्षा अंधश्रद्धा जास्त पसरलेल्या आहेत. तंत्रज्ञान युगात उंदराचा 'माऊस' झाला पण आजही तिथे उंदरासंबंधी अनेक अघोरी नवसे बोलली जातात. देशनोकला जेवण करून आम्ही बिकाणेरला निघालो.

बिकानेर

 बिकानेरला सायंकाळी पोहोचलो.बिका या सरदाराच्या नावावरून या संस्थानाचे नाव 'बिकानेर' असे पडले. बिकानेरचा किल्ला हा जुनागढ म्हणून ओळखल्या जाते. जुनागड किल्ल्याचा पाया हा 1478 मध्ये  राव बिका यांनी रचला. परंतु त्याला इतके भव्य आणि सुंदर बनवण्याच्या कामाला सुरुवात 1589 मध्ये राजा रायसिंह यांनी केली. तिथे कलामंदिर या सुसज्ज हॉटेल मध्ये थांबलो.

सम (जैसलमेर)

दि. 14 मे ला नास्ता  करून रामदेवराकडे निघालो. मध्ये 'बाप' या गावात ताक वगैरे पिऊन रामदेवरा व तिथून सम या गावी पोहोचलो. सम या गावापासून पाकिस्तान फक्त 35 कि. मी. अंतरावर आहे. थार या वाळवंटात  जिकडे नजर जाईल तिकडे फक्त रेती. चालतांना एक पाय टाकणे व दुसरा पाय काढणे,हे कौशल्य होते.तरुण मुले ,काही तर अगदी किशोर वयातील मुले तिथे जीप सवारी,उंट सवारी साठी गुंतलेले आहेत. आम्ही तिथे जीप सवारी केली,उंट सवारी केली. त्यावेळी जीप ड्रायव्हरशी बोलण्यातून त्यांचा शिक्षणाबद्दलचा नकारात्मक दृष्टिकोन मनाला खंताऊन गेला. शिक्षणाने पोट भरत नाही,तर या कामानेच पोट भरते,असं तो म्हणाला. त्या गाड्या किंवा उंट हे त्यांची स्वतःची नव्हती. म्हणजे ती मुले मजूर होती. आम्ही त्या वाळवंटात तेथील पारंपारिक वेशभूषेत फोटोसेशन केले. अगदी बालवयातील मुली त्या व्यवसायात अगदी निपुण होत्या. पोट भरण्याच्या संघर्षात अशा पिढ्यानपिढ्या पिचत आहेत.बालकामगारच जास्त होते. शिक्षणाचे महत्वच तिथपर्यंत पोहचत नाही,याचा खेद वाटला. आम्ही उंटसवारी,जीप सवारी केली. आमच्यासाठी नवलाईची बाब म्हणजे रात्रीचे पावणे आठ वाजत आले तरी दिवस मावळत नव्हता.भारताचे शेवटचे टोक पाहून येताना मुलांचे गाड्या चालवण्याचे अप्रतिम कौशल्य, त्यांचे दारिद्र्य,शिक्षणाबद्दलची अनास्था,उंट,जीप सवारीचा आनंद अशा संमिश्र भावनाचा कल्लोळ होता. सम येथे आमचा जिथे मुक्काम होता तिथे कापडी तंबू होते. एका तंबूत 3-4 जण राहू शकतील अशी व्यवस्था होती.हे तंबू आधुनिक सुविधांनी परिपूर्ण होते. तिथे राहण्याचा अनुभव हा अभूतपूर्व होता. पटांगणाच्या दुतर्फा तंबू, मध्यभागी सांस्कृतिक कार्यक्रमाचे ठिकाण. आम्ही आत जाण्यापूर्वी प्रवेश द्वारावर पारंपरिक पद्धतीने सवाद्य  आमचे औक्षण करून स्वागत केले. आत गेल्यावर सांस्कृतिक कार्यक्रमात पारंपरिक लोकगीते,फिल्मी गीते,लोकनृत्य यांचा आनंद लुटत लुटतच गरम गरम भजे,चिप्स यांचाही आस्वाद दिला. शेवटी शेवटी त्यांच्यासोबत आंतरभारतीच्या पुष्कळ सदस्यांनी मध्यरात्रीपर्यंत त्यांच्यासोबत नृत्य केले. मनमुराद आनंद लुटला. रात्री जेवणात दाल बाटी होत्या. दिवसभराच्या प्रवासाचा थकवा कुठे आणि कधी पळाला,हे देखील कळाले नाही.


 जैसलमेर

       दि. 15 मे ला  सकाळी नास्ता घेऊन जैसलमरला निघालो.जैसलमेरला सोननगरी सुनार हा किल्ला पाहिला. हा किल्ला पूर्ण पिवळ्या दगडांनी बांधलेला आहे.या प्रवासाचे हेच वैशिष्टय की,आदल्या दिवशी गुलाबी शहर पाहिले आणि आज पिवळे शहर! या किल्ल्याला जीवंत किल्ला असेही म्हणतात.कारण इथे आजही लोकवस्ती आहे.तिथे पंच धातूची तोफ आहे.99 बुरुज आहेत. तिथून निघालो. जैसलमरच्या जवळ वॉर म्युझियम आहे. तिथे 100 वर्षापासूनचा युद्धाचा इतिहास, चित्रीकरण, वेगवेगळे प्रसंग तिथे उभारलेले होते. युद्धात वापरली गेलेली शस्त्रे, पाकिस्तान  बरोबर झालेल्या युद्धात हस्तगत केलेली रणगाडा, तोफा, रायफल, वाहने, बंदूका, दूरसंचार साहित्य हे पहायला मिळाले. तिथे बारा मिनिटांची फिल्म ज्यात 100 वर्षापासूनच्या युद्धाचा इतिहास दाखवला, ते पाहून तर अंगावर शहारे उभे रहात होते.फिल्म पहातांना, सैनिकांचे शोर्य, त्याग, बलिदान पाहून डोळ्यातून अश्रू वहात होते. दहा ते बारा मिनिटानेच डोके सुन्न झाले होते. तेथील शिस्त, टापटीप, स्वच्छता हे सगळं पाहून थक्क झालो. प्रवासात पोखरण येथे चहा घेतला. अनुचाचणी झाली तिथे जाण्याची इच्छा होती,परंतु तिथे जाण्यास मनाई होती. त्यादिवशी जोधपूरला मुक्काम केला.

जोधपूर

दि.16 मे ला जोधपूरला सकाळीच आम्हाला भेटायला अमर हबीब यांच्या सहकारी,गांधीवादी तथा सेवाग्राम ट्रस्ट वर्ध्याच्या अध्यक्षा आशादेवी बोथरा मूळ राजस्थानच्या असलेल्या आवर्जून भेटायला आल्या होत्या. त्यांनी त्यांच्या आईसह अत्यंत रोमांचकारी आणि प्रेरणादायी प्रवास आम्हासमोर मांडला. देशातील द्वेषाचे वातावरण निवळण्यासाठी गांधीविचाराची निकड त्यांनी सांगितली. अध्यक्ष पांडुरंग नाडकर्णी यांना खादीची सूतमाला, मला चरखा आणि आंतरभारतीचे राष्ट्रीय सचिव डॉ. डी. एस. कोरे यांना आंतरभारती कार्यासाठी पाच हजार रू. भेट दिली. दातृत्व आणि कर्तृत्व अशी  या प्रवासातील ही ग्रेट भेट होती. जोधपूरला मेहरान गढ पाहिला. इतर किल्ल्याप्रमाणेच फुलमहाल, शिशमहाल, जलमहाल, झाकीमहाल हे आकर्षक आहेत. शस्त्रे, कपडे, दागीने याने सुसज्ज असे म्युझियम आहे. त्यांनतर उदयपूरकडे रवाना झालो. आज दुपारचे जेवण टाळून सर्वांनी केळी आणि सफरचंदाचा फलाहारच घेतला. रात्रीचे जेवण लवकर घेतले आणि उदयपूरला मुक्काम केला.

उदयपूर

        दि. 17 मे ला सकाळी शाही व्हेज बिर्याणीच्या नास्त्याने सर्वचजन खूप खुश झाले. उदयपूरमध्ये एक वॅक्स म्युझियम पाहिले. त्यात महात्मा गांधी, शिवाजी महाराज, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासह अनेक दिग्गजांचे विस्मयकारी पुतळे पाहिले. अचंबीत करणारे भुलभूलैय्या, आरसेनगरी पाहून लहानच काय मोठी मंडळी देखिल थक्क झाली. त्यानंतर पिचोला झीलच्या तिरावर असलेले विशाल असे  सिटी पॅलेस ,जगमंदिर,सहेलियोंकी बाडी, गुलाब गार्डन, अरण्यविलास हे सर्व पाहतांना आपण राजस्थान मधील कडक उन्हात आहोत, याची जाणीव देखिल होत नव्हती. गुलाब गार्डन मध्येच जेवण केले गुलाब गार्डन मध्ये राजू जांगीड यांचे मेहुणे सुरेश धाका यांनी सकाळचा नास्ता व दुपारचे जेवण अगदी अल्प दरात परंतु अत्यंत स्वादिष्ट जेवण दिल्यामुळे छोटेखानी कार्यक्रम घेऊन त्यांचा सत्कार केला आणि  समोरच बागेत  पारंपरिक  कलेचा अप्रतिम सोहळा आम्ही अनुभवला. छोटा मुलगा, स्त्रिया यांनी घोरबन नृत्य, चेरी नृत्यम, मारवाड नृत्य अशा अनेक लोकनृत्याचे सादरीकरण केले. तसेच कठपुतलीच्या बाहुल्यांचीही अप्रतिम कला पाहून डोळ्यांचे आणि मनाचेही पारणे फिटले.शेवटी आम्हीही त्यांच्यासोबत नृत्य केले. तिथून चितोडगढकडे रवाना झालो.

चित्तोडगड

दि. 18 मे ला चितोडगढ पाहिले. गाईडकडून नवनवीन माहिती मिळत होती. मीरा मंदिर, वराह मंदिर, ब्रम्ह- विष्णू- महेश मंदिर अशी वेगवेगळी तिथे 700 एकरमध्ये 113 मंदिरे आहेत. महाराणा कुंभाच्या विजयाच्या स्मरणार्थ उभारलेला गगनचुंबी विजयस्तंभ, 9 ग्रह म्हणून 9 मजल्यांचे मंदिर, राणी पद्मावतीने जोहर केलेला भव्य कुंड, हे सर्व पाहतांना तो इतिहास डोळ्याासमोर उभा रहात होता. राजस्थानमध्ये जातांना आम्हाला मोठा प्रश्न पडला होता,तो पाण्याचा! परंतु इतक्या कडक उन्हात पाणी मात्र सर्वत्र मुबलक प्रमाणात होते.कुठेही पाण्याच्या नावाने लुट वगैरे झाली नाही.  खरच ही यात्रा म्हणजे तापलेल्या भूमीतील अत्यंत शीतल क्षण होते.

           हे सर्व पहात असतांना जागोजागी मोठ्या प्रमाणात खरेदी, फोटोसेशन हेही अतिशय उत्साहात सुरु होते. प्रवासात अंताक्षरी मोठा विरंगुळा होती. शेवटी दाल, बाफले, चुरमा असे जेवण करून समारोपीय बैठक झाली. 

समारोप

बैठकीत या भारत दर्शन यात्रेत असलेल्या सुविधा -असुविधा यावर चर्चा झाली. यावेळी राहिलेल्या त्रुटी पुढच्या यात्रेत मार्गदर्शक ठराव्यात असे ठरले.सर्वांना समान सुविधा मिळाव्यात,राजस्थान समजून घ्यायला हवे,सर्वांत महत्वाचे या यात्रेत सहभागी होणाऱ्यांनी पर्यटक म्हणून नाही या,कार्यकर्ता म्हणून सहभागी व्हायला हवे,असे मुद्दे मनोगतातून् समोर आले.  याप्रसंगी विनया धूपकर, सुधाकर गौरखेडे,अंकुश हुडेकर, सुभाष लिंगायत, संगीता देशमुख, प्रा.शिवाजी सूर्यवंशी, अमृत महाजन. अध्यक्षीय समारोप पांडुरंग नाडकर्णी यांनी केला. पुढच्या वर्षी प बंगाल ला यात्रा काढण्याची घोषणा अमर हबीब यांनी केली. सूत्रसंचालन संजयकुमार माचेवार यांनी केले. 

योगदान

याप्रसंगी राजू जांगीड यांनी या यात्रेसाठी प्रचंड मेहनत घेतली,म्हणून तर पंकज महाजन यांचा धडपड्या कार्यकर्ता म्हणून त्यांचा सत्कार केला.प्रवास सुखकर केल्याबद्दल ड्राइवर,क्लिनर यांचाही बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.या प्रवासासाठी तीन ए. सी. असलेल्या बसेस तर नियोजनासाठी एक कार होती. आंतरभारतीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अमर हबीब यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरभारती यात्रेचे राष्ट्रीय संयोजक संजयकुमार माचेवार यांनी अगदी कमी खर्चात या यात्रेचे  उत्कृष्ट  संयोजन केले होते. यात्रेच्या खूप साऱ्या आठवणी घेऊन  सर्वजण आपापल्या परतीच्या प्रवासाला लागले.


संगीता देशमुख, वसमत

Post a Comment

0 Comments