Latest News

6/recent/ticker-posts

बळीराजा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.शेषराव मोहिते

बळीराजा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.शेषराव मोहिते

शिरूर अनंतपाळ:  जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद,महाराष्ट्र व शब्दपंढरी प्रतिष्ठान, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने उजेड ता.शिरूर अनंतपाळ येथे दि. ९ एप्रिल २०२३ रोजी बळीराजा साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाणार असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी ४२ वे मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा ग्रामीण साहित्यिक डॉ. शेषराव मोहिते यांची सर्वानुमते निवड केल्याची घोषणा जगद्गुरु साहित्य परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. निर्मलाताई पाटील, प्रदेश महासचिव बालाजी जाधव, उजेडकर, प्रदेश संघटक सतीश हानेगावे व शब्दपंढरी प्रतिष्ठान,लातूरचे अध्यक्ष योगिराज माने यांनी केली आहे. या एकदिवसीय बळीराजा साहित्य संमेलनात  ग्रंथदिंडी, उदघाटन सत्र, कृषीजीवनातील व्यथा वेदना व उपाय या विषयावरील परिसंवाद, निमंत्रित कविंचे कविसंमेलन, कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांची प्रेरणादायी मुलाखत व समारोप सत्र अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. परिसंवादाचे अध्यक्षपद ख्यातनाम साहित्यिक प्रा.फ.म.शहाजिंदे हे भूषविणार असून यात अमर हबीब, प्रा.सुरेंद्र पाटील ,डॉ. ज्ञानदेव राऊत हे सहभागी होणार आहेत.


 कविसंमेलनात महाराष्ट्रातील ख्यातनाम कविंचा सहभाग असणार आहे. या संमेलनासाठी जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी आणि शब्दपंढरी प्रतिष्ठान, लातूरचे पदाधिकारी उपस्थित राहणार असून लातूर व परिसरातील  विद्यार्थ्यांनी, युवकांनी, गावक-यांनी व साहित्यरसिकांनी या संमेलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन संयोजकाकडून करण्यात आले आहे. बळीराजा साहित्य संमेलनाची सविस्तर निमंत्रणपत्रिका लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. असे प्रसिद्धीत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments