Latest News

6/recent/ticker-posts

शेतकऱयांच्या आत्महत्या राष्ट्रीय आपत्ती- अमर हबीब

शेतकऱयांच्या आत्महत्या राष्ट्रीय आपत्ती- अमर हबीब


गोटखिंडीतील व्याख्यानमालेत विचार यज्ञास प्रारंभ

इस्लामपूर: स्वातंत्र्यानंतर साडेचार लाख शेतकऱ्यांनी देशात आत्महत्या केल्या हे आपल्या कृषीप्रधान देशाचे दुर्दैव आहे. कोणत्याही आपत्तीपेक्षा शेतकऱ्यांच्या आत्महत्येची संख्या जास्त आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मीडिया मधूनही कारणमीमांसा  केली जात नाही. देश स्वातंत्र्य झाला पण शेतकरी स्वातंत्र्य झाला नाही, ही शोकांतिका आहे असे मत किसानपुत्र आंदोलनाचे नेते अमर हबीब यांनी 'इडा पिडा टळो बळीच राज्य येवो' या विषयावर बोलताना व्यक्त केले. गोटखिंडी तालुका वाळवा येथील चला गाव घडवूया चळवळी अंतर्गत, साद माणुसकीची या सेवाभावी संस्थेमार्फत आयोजित व्याख्यानमालेतील प्रथम पुष्प गुंफताना ते बोलत होते.  स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. संजय थोरात यांनी केले. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील, गोटखिंडीच्या सरपंच दिपाली दिलीप पाटील, येडेनिपाणीचे आनंदराव पाटील, कामेरीचे सरपंच रणजीत पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमर हबीब म्हणाले, स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या मुलांनी बलिदान दिले. ज्यावेळी शेतकरी लढ्यात उतरले त्याचवेळी ती लोक चळवळ बनली. गांधीजींनी स्वतंत्र लढ्याची बांधणी केली व शेतकरी त्यामध्ये उतरला व देश स्वतंत्र झाला. पण शेतकरी स्वातंत्र नाही झाला. ज्याच्या नावावर सातबारा आहे, तो शेतकरी नव्हे तर ज्याच्या उत्पन्नाचे मुख्य साधन शेती आहे, तो शेतकरी आहे. शेतकऱ्यांना शेती उत्पादनात आयकर लागत नाही पण याचा फायदा शेतकऱ्याच्या ऐवजी मोठ्या नोकरदार व पुढाऱ्यांनी घेतला आहे. काळा पैसा पांढरा करण्यासाठी भ्रष्ट लोकांनी शेतीचा उपयोग केला आहे.  99 टक्के शेतकऱ्यांचे उत्पन्न आयकर मर्यादेपेक्षा कमी आहे. इंग्रजांच्या काळात व सध्याही शेतकऱ्यांच्यावर कायद्याने बंधन घातली असून सर्वत्र लुटीचा अवलंब केला जात आहे. शेतकऱ्याच्या मुलांनीच शिकून मोठे होऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन बाबासाहेब तिबिले यांनी तर आभार रमेश कांबळे यांनी मानले. व्याख्यानाला गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments