ऑर्बीट प्री-प्रायमरी इंग्रजी शाळेत फातिमा शेख यांची जयंती उत्साहात साजरी
औसा:(प्रतिनिधी) येथील नबी नगर स्थित ऑर्बीट प्री-प्रायमरी इंग्रजी शाळेत भारताच्या पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा शेख यांची जयंती साजरी करण्यात आली. फातिमा शेख व त्यांचे बंधू उस्मान शेख यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना पुण्यातील आपले राहते घर शाळा चालू करण्यासाठी दिले व त्यांना मुलींची शाळा चालविण्यास सर्वतोपरी सहकार्य केले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुमनेहा इकबाल शेख यांनी विद्यार्थ्यांना भारताच्या पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा शेख यांच्या आयुष्यातील खडतर प्रवासाविषयी माहिती देताना सांगितले की, क्रांतिसूर्य जोतिराव फुले यांनी मुलींसाठी अनेक शाळा काढल्या.सावित्रीबाई आणि फातिमा तिथे शिकवू लागल्या. जेव्हाही त्या तिथून जात असे तेव्हा लोक त्यांच्यावर हसायचे आणि दगडफेक करायचे. दोघेही हा अतिरेक सहन करत राहिले पण त्यांनी आपले काम थांबवले नाही. फातिमा शेख यांच्या काळात मुलींच्या शिक्षणात असंख्य अडथळे आले. अशा काळात त्यांनी स्वतः शिक्षण घेतले. इतरांना लिहायला आणि वाचायला शिकवलं. शिक्षण देणार्या त्या पहिल्या मुस्लिम महिला होत्या ज्यांच्याकडे शिक्षणाचे प्रमाणपत्र होते. फातिमा शेख यांनी मुलींच्या शिक्षणासाठी केलेली सेवा विसरता येणार नाही. घरोघरी जाऊन लोकांना शिक्षणाची गरज समजावून सांगणे, मुलींना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची मनधरणी करणे ही फातिमा शेखची सवय झाली होती. अखेर त्याच्या मेहनतीला फळ मिळू लागले. लोकांच्या विचारात बदल झाला. त्यांनी मुलींना शाळेत पाठवायला सुरुवात केली. मुलींमध्येही शिक्षणाची आवड निर्माण होऊ लागली. शाळेत त्यांची संख्या वाढतच गेली. मुस्लिम मुलीही आनंदाने शाळेत जाऊ लागल्या. प्रतिकूल परिस्थितीत प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात जाऊन शिक्षणाच्या महान कार्यात जोतिराव आणि सावित्रीबाई फुले यांना साथ देणाऱ्या पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांना सलाम. या दोघांचा समान संघर्ष हाच आपला वारसा आहे, जो आजकाल संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, ही चिंतेची बाब आहे. असे ही मत शेवटी त्यांनी मांडले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतील शिक्षिका बुशरा पंजेशा यांनी सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले. यावेळी शिक्षिका सय्यद आयेशा, पटेल तरन्नूम, शेख सुमैय्या, पठाण तहेनियत, बागवान जिनत व संस्थेचे अध्यक्ष शेख रसूलसाब गुरुजी, सहसचिव शेख फकीरपाशा, मजहर पटेल, आसेफ शेख, अरबाज शेख, अल्ताफ सिद्धिकी, उमर शेख उपस्थित होते.
0 Comments