लातूर शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी- माझं लातूर परिवार
लातूर: शहरातील बेशिस्त वाहतूक व्यवस्थेला आळा बसावा यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा माझं लातूर परिवाराच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली. यासंबंधीचे सविस्तर निवेदन जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, मनपा आयुक्त आणि पालकमत्र्यांना माझं लातूर परिवाराच्या वतीने देण्यात येणार आहे.
शहरातील विस्कळीत वाहतूक व्यवस्था, रस्त्यावरील अतिक्रमण, खाजगी शिकवणी भागात वाढलेली गुंडगिरी, कॉफी सेंटरच्या नावाखाली चाललेला गैरप्रकार अशा विविध विषयांवर आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. लातूरच्या सुसंस्कृत, सौहार्दपूर्ण प्रतिमेला तडा जाणाऱ्या घटनांना त्वरीत पायबंद घालण्यासाठी माझं लातूर परिवार प्रशासनास सर्वोतोपरी सहकार्य करेल. यासोबतच येत्या काळात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, नेत्र तपासणी, रक्त तपासणी, आरोग्य शिबीर असे विविध सामाजिक उपक्रम माझं लातूर परिवाराच्या वतीने आयोजित करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
यशवंतराव चव्हाण व्यापारी संकुल येथे संपन्न झालेल्या बैठकीस अभय मिरजकर, प्रमोद गुडे, ॲड. प्रदीप मोरे, दिपरत्न निलंगेकर, ॲड.राहुल मातोळकर, संजय स्वामी, किशोर जैन, के. वाय. पटवेकर, रत्नाकर निलंगेकर, जुगलकिशोर तोष्णीवाल, काशीनाथ बळवंते, श्रीराम जाधव, विष्णु आष्टीकर, विनोद कांबळे, सतीश तांदळे यांची उपस्थिती होती.
0 Comments