लातूर शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतुकीत बदल करणार, जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत निर्णय
शहरातील प्रत्येक चौकातील अतिक्रमण काढण्याची सूचना
■ बसस्थानक ते शाहू महाविद्यालय रस्ता चार चाकीसाठी 1 जानेवारी पासून बंद
■ रिक्षा थांबे, बाहेरगावी जाणारी खाजगी वाहतूक थांबा निश्चित करणार
लातूर:(जिमाका) दि. 21 - शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी 1 जानेवारी पासून प्रायोगिक तत्वावर बसस्थानक ते शाहू कॉलेज रस्ता चार चाकीसाठी त्या बाजूने बंद करण्यात येईल. शहरातील प्रत्येक चौकातील अतिक्रमण काढण्यात येणार असून रिक्षा थांबे, बाहेर गावी जाणाऱ्या खासगी जीप्स, बस वाहतूक यांच्यासाठी जागा निश्चित करून देण्याची कार्यवाही करण्याची सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ता सुरक्षा समितीची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक सोमय मुंडे, महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. एस.टी. प्रशासनाने शहरातील बसस्थानकातील पार्सल कार्यालयाची जागा बदलता येईल का हे पहावे. दिनांक 1 जानेवारी, 2023 पासून प्रायोगिक तत्वार राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर या रस्ता या मार्गे चारचाकी वाहनासाठी बंद असेल तिथे येणाऱ्यासाठी गुळ मार्केटकडून प्रवेश सुरु असेल. उद्यापासून म्हणजे दि. 22 डिसेंबर, 2022 पासून गंजगोलाईतील फेरीवाले,भाजी विकेत्यांनी रेलिंगच्या आतच बसण्याची कार्यवाही करण्यात येईल. गंजगोलाई येथील स्वच्छतागृहाच्या शेजारी ॲटोरिक्षा थांबा करण्यात यावा. शहरातील प्रत्येक चौकात झालेले अतिक्रमण तात्काळ काढून टाकण्याची कारवाई प्रशासनाने करावी. साई नाका चौकातील पीव्हीआरकडे जाणाऱ्या रिंगरोडच्या सर्व्हिस रोडवरील डिव्हायडरमुळे अडथळा निर्माण होत आहे, तो 12 फुटापर्यंतचा काढण्याची सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली. बसवेश्वर चौकातून मार्केट यार्डला येणाऱ्या रस्त्यावर फक्त मार्केटला येणाऱ्या मालवाहतूकीला परवानगी देण्यात येईल. इतर वाहनांना बंदी घालण्यात यावी. शहरातील नादुरुस्त असलेले सीसीटीव्ही दुरुस्तीचे कामे तात्काळ पूर्ण करावेत.
दोन ठिकाणी नवीन सिग्नल
अहिल्याबाई होळकर चौक , पीव्हीआर चौक या दोन ठिकाणी नवीन सिग्नल बसविण्याचे नियोजन करण्याबाबतही जिल्हाधिकारी यांनी सूचित केले.
ट्रॅव्हल्स बस रात्री 8 पासून 9 पर्यंतच शहरात परवानगी
रात्री 8-00 ते सकाळी 9-00 वाजेपर्यंतच ट्रॅव्हल्स बस शहरात येतील. रात्री 8 पूर्वी आणि सकाळी 9 नंतर शहरात प्रवेश बंद असेल, याबाबत ट्रॅव्हल्स चालकांनी व मालकांनी काळजी घ्यावी.
ट्रक टर्मिनलसाठी जागा
एमआयडीसी येथे ट्रक टर्मिनलसाठी महानगरपालिकेची जागा राखीव आहे. त्या जागेची तात्काळ पाहणी करून ट्रक टर्मिनल करण्याबाबत महानगरपालिकेने नियोजन करावे अशा सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिल्या.
0 Comments