जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, खेळाडूला मिळणार पुरस्कार
लातूर:(जिकामा) दि. 18 - जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडू तसेच गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या योगदानाचे मूल्यमापन व्हावे, त्यांचा गौरव व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणाअंतर्गत जिल्हास्तरावर जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या 14 डिसेंबर 2022 रोजीच्या सुधारित शासन निर्णयानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने गुणवंत खेळाडू (पुरुष, महिला व दिव्यांग), गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्याकाडून या पुरस्कारासाठी 27 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे.
जिल्हा क्रीडा पुरस्काराअंतर्गत लातूर जिल्ह्यात जास्तीत जास्त चार पुरस्कार देण्यात येतील. तसेच शासन निर्णयामध्ये नमूद आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूंना ज्यादाचा पुरस्कार गणल्या जाईल. यामध्ये तीन गुणवंत खेळाडू पुरस्कार (एक महिला, एक पुरुष व एक दिव्यांग), तसेच एका गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराचा समावेश असेल. प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व दहा हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या खेळाडू, मार्गदर्शकाचे महाराष्ट्रात सलग 15 वर्षे वास्तव्य असणे आवश्यक आहे.
गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी सतत दहा वर्षे लातूर जिल्ह्यात क्रीडा मार्गदर्शकाचे कार्य असावे. तसेच गेल्या दहा वर्षांत किमान वरिष्ठ गटातील राज्य व राष्ट्रीय पदक विजेते, कनिष्ठ शालेय ग्रामीण व महिला (खेलो इंडीया) मधील राष्ट्रीय स्तरापर्यंतचे पदक विजेते खेळाडू घडविलेले क्रीडा मार्गदर्शक जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहतील. त्यांची वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. गुणांकणासाठी लातूर जिल्ह्यातील खेळाडूंचीच कामगिरी ग्राह्य धरली जाईल. गुणवंत खेळाडू पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या खेळाडूने पुरस्कार वर्षासह लगत पूर्व पाच वर्षांपैकी दोन जिल्ह्याच्या मान्यता प्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व केलेले असावे. या पुरस्काराचे वर्ष एक जुलै ते 30 जून या कालावधीतील राहील.
अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या जिल्ह्यातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व गुणवंत खेळाडू (पुरुष, महिला व दिव्यांग) यांनी जिल्हा क्रीडा पुरस्काराचा विहीत नमुन्यातील अर्ज व अधिक माहितीसाठी तालुका क्रीडा अधिकारी सुरेंद्र कराड (भ्रमणध्वनी क्र. 7972397130) आणि क्रीडा अधिकैर कृष्णा केंद्रे (भ्रमणध्वनी क्र. 9975576600) यांच्याशी संपर्क साधावा. लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात आपला परिपूर्ण अर्ज 27 डिसेंबर 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावा. उशिरा येणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. जिल्ह्यातील जास्तीत जास्त क्रीडा मार्गदर्शक व खेळाडू यांनी जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.
जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी या खेळांमध्ये सहभाग आवश्यक
धनुर्विदया, मुष्ठीयुध्द, मैदानी क्रीडा स्पर्धा, क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल, बिलियर्डस अॅण्ड स्नुकर, हॅण्डबॉल, कॅरम, हॉकी, बुध्दीबळ, ज्युदो, सायकलिंग, कबड्डी, तलवारबाजी, कयाकिंग/कॅनोईग, गोल्फ, खो-खो, जिम्नॅस्टिक्स, भारोत्तोलन (पॉवरलिफ्टींग), अश्वारोहण, रोईग, लॉनटेनिस, तायक्वाँदो, मल्लखांब, व्हॉलीबॉल, नेमबाजी, वजन उचलणे (वेटलिफ्टींग), स्केटिंग, कुस्ती (रेसलिंग), जलतरण (डायव्हींग वॉटरपोलो), वुशू, टेबलटेनिस, यॉटींग, ट्रायथलॉन, सॉफ्टबॉल, आट्यापाटया, रग्बी, वास्केटबॉल, मॉडर्न पॅटॉथलॉन, शरीरसौष्ठव, बेसबॉल, स्पोर्ट क्लाइंबिंग, स्क्वॅश आदी खेळांचा जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी विचार केला जाणार आहे.
0 Comments