Latest News

6/recent/ticker-posts

शेतकरी आत्महत्या थांबाव्यात म्हणून...

किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब यांच्या लेखणीतून...

शेतकरी आत्महत्या थांबाव्यात म्हणून...


19 मार्च 1986 रोजी साहेबराव करपे कुटुंबीयांनी सामूहिक आत्महत्या केली होती. ही नोंदली गेलेली अलीकडच्या काळातील सर्वात धक्कादायक आत्महत्या. तेंव्हा पासून सुरू झालेल्या आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाहीत. सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होतात. सरासरी दररोज सात. आपल्या अवतीभोवती शेतकरी आत्महत्यांचा वणवा पेटला आहे. तो विझवण्याचे काम प्रामुख्याने सरकारचे आहे. कारण शेतकरी आत्महत्यांचे मूळ कारण सीलिंग, आवश्यक वस्तू आदी शेतकरीविरोधी कायदे आहेत. ते रद्द करण्याची जबाबदारी केंद्र व राज्य सरकारची आहे. दुर्दैवाने या बाबत दोन्ही सरकारे काहीच करीत नाहीत. किंबहुना हे कायदे टिकतील असेच प्रयत्न केले जात आहेत व वेगवेगळ्या कायद्यांच्या तलवारींनी शेतकऱयांची मुंडकी छाटली जात आहेत. अशा परिस्थितीत माझ्या-तुमच्या सारखा सर्वसामान्य माणूस काय करू शकतो?  घरात सुतक पडले तर आपल्याला अन्नाचा घास जात नाही, तेच आपण करू शकतो! म गांधींनी आपल्याला उपोषणाचे शस्त्र दिले आहे. त्याचा वापर करू शकतो. 2017 पासून लाखो किसानपुत्र स्त्री पुरुष 19 मार्च रोजी उपवास/अन्नत्याग/उपोषण करून आपली सहवेदना व्यक्त करतात. मी चिलगव्हाण, महागाव (साहेबराव करपे यांचे गाव) येथे दिवसभर उपवास करून सुरुवात केली. पुढे दत्तपुर-पवनार, राजघाट-दिल्ली, फुलेवाडा-पुणे, चिलगव्हाण या ठिकाणी उपोषण केले. या वर्षी 2022 साली आंबाजोगाई येथे (माझ्या गावी) उपवास करणार आहे. आंबाजोगाई येथे शेकडो लोक 19 मार्चला उपवास करतात. उपवासाची सांगता करण्यासाठी एकत्र जमतात. या वर्षी मी त्यात सामील होणार आहे. गेल्या वर्षी औंढा नागनाथ ते चिल गव्हाण अशी 120 किलोमीटरची पदयात्रा निघाली होती. या वर्षी पानगाव ते आंबाजोगाई अशी 60 कि.मी.ची पदयात्रा निघणार आहे. डॉ राजीव बसरगेकर (मुंबई), सुभाष कच्छवे (परभणी), रामकिसन रुद्राक्ष (हिंगोली), दीपक नारे (नागपूर), मयूर बागुल (पुणे) बालाजी आबादार (नांदेड) आदीनी ती जबाबदारी घेतली आहे. पन्नास पदयात्री भाग घेतील अशी अपेक्षा आहे. हे किसानपुत्र विविध जिल्ह्यातून येणार आहेत. पानगाव येथे 1982च्या शेतकरी आंदोलनात गोळीबारात ठार झालेल्या रमेश मुगे यांचे स्मारक आहे. तेथून पदयात्रेला सुरुवात होईल. आंबाजोगाई येथे उपोषणाची सांगता व पदयात्रेचा समारोप होईल. मित्रानो, हा उपवास राजकीय पक्षांचा नाही, हा कोणताही धार्मिक उपवास नाही. यात कोणीही सहभागी होऊ शकतो. अगदी सरकारी कर्मचारी सुद्धा उपवास करू शकतात. कारण तुम्ही काम करीत करीत उपवास करू शकता. पण कोणाला वाटले की, सामूहिक एकत्र बसून करावे तर त्यालाही हरकत नाही. अपेक्षा एवढीच की, दिवसभर 'शेतकरी आत्महत्या कारणे व उपाय' यावर एकत्र बसुन विचार विनिमय करावा. महाराष्ट्रातील लाखो स्त्री-पुरुष 19 मार्चला उपवास करून आपली सहवेदना व्यक्त करतात. या वर्षी तुम्हीही कराल अशी अपेक्षा आहे. अशा छोट्या छोट्या प्रयत्नातूनच शेतकरी स्वातंत्र्याचा सूर्य उगवणार आहे!


अमर हबीब,आंबाजोगाई

Post a Comment

0 Comments