ज्येष्ठ पत्रकार संजय जेवरीकर यांच्या लेखणीतून...
पश्चिम महाराष्ट्राच्या पाण्यासाठी अस्वस्थ झालेले शरद पवार..
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांचा वाढदिवस..महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ओळखणारा,अचूक निदान करून त्यावर तोडगा काढणारा,दिल्लीत बैठक घेतली तर त्याची ठळक बातमी होणारा,सहकार,शिक्षण आणि समाजकारण करताना पश्चिम महाराष्ट्राला आग्रहाचं पान वाढणारा,कार्यकर्त्यांसाठी काहीही करण्याची आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा..त म्हटलं की ताकभातच असतो असे ठणकावून सांगणारा आणि विचारांची चौफेर उंची लाभलेला हा नेता आपली शान आहे..मागच्या लोकसभा निवडणूक प्रसंगी काही मोजक्या महाराष्ट्रातील पत्रकारांसोबत मलाही भेटण्याचा योग आला..साडेतीन तास वेळ देऊन बारकाईने आमचे म्हणणे ऐकून घेत,दलित आणि मुस्लिम समाज पक्षापासून दूर का जात आहे?याचे विचारमंथन करताना शांत आणि संयमाने फक्त ऐकण्याची भूमिका बजावणारा हा नेता असल्याने ही आपली शान आहे.. शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्राचा विकास केला या मताशी सगळाच महाराष्ट्र संमत आहे.. काहीही झाले तरी पश्चिम महाराष्ट्रात कशाचीच कमतरता पडू द्यायची नाही हे शरद पवार यांचे धोरण..तिथे काही घडलं की अस्वस्थ होणारे शरद पवार खऱ्या अर्थाने या भागाचे प्रतिनिधित्व करणारे नेते..राजा कसा असावा,प्रजेला काटा टोचला तर त्याच्या डोळ्यात पाणी आले पाहिजे असे राजकारणी आज दिसत नाहीत,आता तर राजकारण कॉर्पोरेट झालेय,सगळी गणिते आधीच बांधली जातात..पैसे,गाड्याचा ताफा,हातात सोन्याचे कडे,गळ्यात चैन,डोळ्यावर गॉगल,हातात अंगठ्या असे सगळे आयात केलेले नेते सामाजिक प्रश्नापासून
कोसो दूर असल्याचे दिसून येत आहेत.. यशवंतराव,शरदराव,वसंतदादा,शंकरराव,विलासराव,गोपीनाथराव अश्या मंडळींची खरी नाळ जनतेशी जुळलेली होती..आपल्या भागाचा विकास,सामान्य माणसाच्या परिवर्तनाचा ध्यास अश्या भूमिका घेऊन ही मंडळी राजकारण करायची..हल्ली हे सगळे संपत चाललेय..कमी दिवसात सत्ता मिळवायची,स्वतःची तुंबडी भरायची किंवा परंपरागत राजकारणावर रेघोट्या मारायच्या.. आज शरद पवार यांच्यावर लिहिण्याचे कारण म्हणजे हा नेता पश्चिम महाराष्ट्राच्या प्रश्नावर किती बारकाईने लक्ष ठेवून असतो,असे नेते त्या त्या विभागासाठी का तयार झाले नाहीत ? हा माझ्या मनाला पडलेला प्रश्न आहे.. देवघर धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारे नियमबाह्य पाणी बंद करण्याचा आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी त्याकाळी देताच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनी संताप व्यक्त केला.. राजकारण कुठे करावे याचं तारतम्य जपलं पाहिजे, अशा शब्दात पवारांनी त्यावेळेस प्रतिक्रिया दिली होती..
जलसंपदा मंत्र्यांनी बारामतीचे पाणी रोखले, अशा बातम्या वर्तमानपत्रात झळकल्यानंतर दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच महाजन यांचे नाव न घेता कान टोचले. ''राजकारण कुठे करावे याचे तारतम्य जपले पाहिजे. भागा-भागात जिल्ह्या-जिल्ह्यात दुरावा निर्माण होता कामा नये, तशी काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे.'' असे म्हणत पवार यांनी पाणीप्रश्नावरुन संतप्त प्रतिक्रिया दिली. आपल्या ट्विटर आणि फेसबुक अकाऊंटवरुनही याबाबत माहिती देण्यात आली .. वीर-भाटघर धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे 57 टक्के व डाव्या कालव्याद्वारे 43 टक्के पाणी वाटपाचे धोरण 1954 च्या पाणी वाटप कायद्यानुसार ठरले होते. त्यानुसार उजव्या कालव्यातून सातारा जिल्ह्यातील फलटण तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला व पंढरपूर या तालुक्यांना पाणी मिळत होते. डाव्या कालव्यातून बारामती व इंदापूर तालुक्याला पाणी मिळत होते.
4 एप्रिल 2007 रोजी राज्याच्या मंत्रिमंडळात स्वत:ची राजकीय ताकद वापरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सन 2009 मध्ये पाणी वाटपाचा करार बदलला. त्यामध्ये नीरा देवधर धरणातून 60 टक्के पाणी डाव्या कालव्यातून बारामती व इंदापूर तालुक्याला व 40 टक्के पाणी फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपूर तालुक्याला देण्याचा निर्णय घेतला. हा करार 3 एप्रिल 2017 पर्यंतचा करण्यात आला होता. विधान परिषदेचे सभापतीपद मिळाल्याने आ. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी या कराराला विरोध न करता संमती दिली होती. 3 एप्रिल 2017 रोजी करार संपल्यावरही बेकायदेशीरपणे हे पाणी बारामती तालुक्याला दिले जात होते. हे बेकायदा जाणारे पाणी बंद करून ते पुन्हा फलटण, माळशिरस, सांगोला व पंढरपूर तालुक्यास मिळावे, अशी मागणी खा. नाईक-निंबाळकर व माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. याबाबत त्यांनी पुन्हा जलसंपदा मंत्री महाजन यांची भेट घेतली. महाजन यांनी डाव्या कालव्यातून बारामतीला नियमबाह्य जाणारे पाणी कायमचे बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. याबाबत आदेश येत्या दोन दिवसांत काढावा, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले होते..त्यावर राळ उठवून शरद पवार यांनी हक्काचे पाणी बारामतीला सोडण्याची व्यवस्था केली..अश्या बातम्या आमच्या मराठवाड्यात अनेक घडत असतात,शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा आमचा रोजचा विषय आहे..पाणी नसल्यामुळे मराठवाडा कायम दुष्काळग्रस्त बनलाय..शेतकरी कायम हैराण आहे मात्र आमच्या पाणीप्रश्नावर काम करणारा नेता का तयार झाला नाही..सिंचनाचे प्रश्न कायमस्वरूपी का सुटले नाहीत?आम्ही इतके सजग का नाहीत?एकमेकांवर कुरघोडी करण्यात का हैराण आहोत?आमचे प्रश्न नेत्यांचेही आहेत हे त्यांना का पटत नाहीत?आम्ही केवळ आमच्या स्वार्थी राजकारणात का गुंतून पडलोय?बारामतीचे पाणी कापले तर महाजनांवर तुटून पडणारा शरद पवार यांच्यासारखा सजग नेता आमच्यात का निर्माण होत नाही..?
बारामतीकरानो,तुम्हाला सॅल्युट..तुम्ही या नेत्याच्या पाठीशी उभारलेली ताकद अंध नाही डोळस आहे..शरद पवार म्हणूनच आपण ग्रेट आहात...
आज आपल्या 81व्या वाढदिवसानिमित्त आपणास उदंड आयुष्य लाभो,या शुभेच्छा..
संजय जेवरीकर{ ज्येष्ठ पत्रकार }
0 Comments