Latest News

6/recent/ticker-posts

सगळे नेते वर एकच असतात.. कार्यकर्त्यांच्या भिंती मात्र खाली कायम असतात..

ज्येष्ठ पत्रकार संजय जेवरीकर यांच्या लेखणीतून... 

सगळे नेते वर एकच असतात... कार्यकर्त्यांच्या भिंती मात्र खाली कायम असतात...


या फोटोने जुन्या आठवणी आज पुन्हा जाग्या केल्या... शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांचा हा फोटो खूप जुना आहे... शरद पवार, स्व.इंदिरा गांधी आणि पाठीमागे स्व.बाळासाहेब ठाकरे दिसत आहेत... सध्या महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आघाडी आहे... शरद पवार या आघाडी महानाट्याचे निर्माते आहेत... ठाकरे कुटुंब नेहमी स्वतःकडे रिमोट कंट्रोल ठेवून काम करत आले आहे... स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाचा सहभाग सत्तेत ठेवला मात्र कुटुंबाकडे कुठलेही पद ठेवले नाही... भारतीय जनता पार्टीच्या गर्वहरण नाट्यासाठी शरद पवार,उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रात हा कधीही न जमलेला नवा डाव मांडला आणि ठाकरे कुटुंबातील एकजण मुख्यमंत्री आणि एकजण कॅबिनेट मंत्री झाला... राजकारणात तत्वांपेक्षा खुर्चीला महत्व देण्याचा पायंडा भाजपनेच पाडला आहे... सत्तेसाठी कधी माया, कधी ममता, कधी जयललिता हा प्रयोग राजकारणात भाजपनेच आणला... काहीही झाले तरी सत्तेत आपण राहिलो पाहिजे, कार्यकर्ते जगले पाहिजेत आणि पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा जमा केला पाहिजे हे धोरण भाजपने राबवले... आज तत्वाच्या गप्पा मारण्यात दंगलेल्या भाजपने त्यावेळेस तत्व डोक्याला गुंडाळली होती का ? हा प्रश्न सहज मनामध्ये येतो... इथे चूक एक झाली की पाच वर्षे सत्तेत राहून शिवसेनेने पलटी मारली आणि बहुमत असताना सत्तेत जाता आले नाही त्याचे दुःख भाजपला झाले आहे...


या फोटोत हे तिन्ही दिग्गज एकत्रित आहेत... राजकारणात दिल्लीत सगळेच एका कपातला चहा पितात आणि एकच बॉटल शेअर करत असतात... आपण कार्यकर्ते इकडे एकमेकांच्या विरोधात भांडत राहतो,-फटाके वाजवतो, वर्षोनुवर्षे तोंड पाहत नाही... दुरावा निर्माण करून आपण आपले आयुष्य त्यांच्या पायावर वाहत राहतो... हल्ली देशात एक ट्रेंड निर्माण झालाय,एखादा विषय दुपारपर्यंत ताणायचा आणि दुपारनंतर कुठेतरी सरेंडर होत राहायचं... मीडिया सुद्धा याच मार्गावर निघाला आहे..माझा शिवसैनिक, माझा कार्यकर्ता अशी बिरुदं लावून त्या कार्यकर्त्यांची आयुष्य बरबाद करण्याचा अधिकार या राजकीय पक्षांना कोणी दिला... अनेक कार्यकर्ते बरबाद झाले आहेत,अनेक शिवसैनिक आजही पोलीस ठाणे आणि कोर्टात चकरा मारून हैराण झाले आहेत... अजुनही गावागावात पक्षाच्या भिंती उभ्या आहेत... कार्यकर्ते आहेत तिथेच आहेत आणि नेत्यांची मुले राजकारणात पुढे जात आहेत, कार्यकर्ते आहेत तिथेच आहेत आणि नेत्यांचे नातेवाईक राजकारणात स्थान मांडू लागले आहेत.सगळी नेते मंडळी वर एकच असतात मात्र खाली कार्यकर्त्यांच्या भिंती कायम असतात हे त्रिकालाबाधित सत्य कार्यकर्त्यांना कोण सांगणार ?

संजय जेवरीकर{ ज्येष्ठ पत्रकार }




Post a Comment

0 Comments