ज्येष्ठ पत्रकार संजय जेवरीकर यांच्या लेखणीतून...
...आशियाना ढुंडते
लातूरच्या राजकारणात आशियाना आणि देवघर या दोन्ही घरांना एक वेगळे महत्व आहे..एका घरी दिलीपराव देशमुख हे जाणकार राजकारणी राहतात तर दुसऱ्या घरी शिवराज पाटील हे स्थितप्रज्ञी राजकारणी राहतात. 25 वर्षांपूर्वी या शहराचे राजा स्वर्गीय नारायणलाल लाहोटी यांच्या घराचे असेच महत्व होते..अटलबिहारी बाजपेई पासून ते अनेक दिग्गज नेत्यांनी या घरचा पाहुणचार घेतला..आज हे सगळे आठवायचे कारण म्हणजे राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आशियानाचा पाहुणचार घेतला आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवा आयाम दिला..अलीकडच्या काळात दिलीपराव देशमुख यांच्या आशियानावर आणि शिवराज पाटील चाकूरकर यांच्या देघरला राजकारणात वेगळे महत्व नक्कीच आहे..खरं ही महाराष्ट्रासाठी बातमी व्हायला हवी..महाराष्ट्राच्या राजकारणात देशमुख पवार वाद जुना आहे..विलासराव देशमुख यांनी तो मुद्दामहुन जपला होता,त्याचा राजकीय फायदा त्यांना नक्कीच झाला..स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्यानंतर शरद पवार यांना तोडीस तोड देणारा तसा आता कोणी नेताही शिल्लक नाही त्यामुळे हा वाद आता नव्या पिढीने संपुष्टात आणला आहे..मध्यंतरी एका टीव्ही चॅनलवर आमदार धीरज देशमुख आणि आमदार रोहित पवार यांची राजकीय ट्युनिंग महाराष्ट्राने पाहिली.. नव्या दमाचे हे नेते महाराष्ट्रात काहीतरी नवे पायंडे पाडू इच्छितात, काहीतरी नवीन मांडणी करण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे जुने वाद बंद करून नव्या विचाराचे काही देता येईल का असा विचार ते ठरवून मांडत आहेत..
अजित दादा आणि दिलीपराव देशमुख यांच्या पहिल्या राजकीय प्रवेशानंतर अनेक टीका शरद पवार आणि विलासराव देशमुख यांना सहन कराव्या लागल्या होत्या..नव्या मंडळींचे प्रवेश झाले की,पहिला मार पडतो कानभरू कार्यकर्त्यांना..त्यांची दुकानदारी बंद होते,पहिली बदनामी तेच सुरू करतात..या दोघांच्या प्रवेशानंतर असेच काहीसे घडले होते,मात्र दोघांनीही महाराष्ट्रात कामातून सिद्ध केले..दोघांचे स्वभाव बेधडक बिनधास्त आणि कडक आहेत..दोघांचेही कार्यकर्ते नीटनेटके असतात,गबाळे कार्यकर्ते दोघानाही आवडत नाहीत..जे काम होते ते होते नाहीतर नाही असे स्पष्ट सांगणारे हे दोन्ही नेते आज भेटले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या पर्वाला सुरुवात झाली.
महाराष्ट्रात येणाऱ्या काळात निवडणूका आहेत,महाविकास आघाडीतील तिन्ही घटकांनी ही निवडणूक एकत्रित लढली तर नक्कीच फरक पडणार आहे..सगळ्याच जिल्हयात असे प्रयोग व्हायला हवेत,त्यातून कार्यकर्त्यांना नवी स्फूर्ती मिळते आणि संदेशही जातो..पवार - देशमुख भेटीच्या या बातमीने नक्कीच महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली दरी संपायला मदत होईल,फक्त एक करावे लागेल आता त्या त्या जिल्ह्यातील समविचारी पक्षाना आणि नेत्यांना मैत्रीची वागणूक द्यायला हवी...
संजय जेवरीकर{ ज्येष्ठ पत्रकार }
0 Comments