Latest News

6/recent/ticker-posts

प्रवासी मी दिगंताचा...

 प्रा.ए. वाय.शेख यांच्या लेखणीतून..

              प्रवासी मी दिगंताचा...

     

        "    जन पळभर म्हणतिल हाय हाय

             मी जाता राही कार्य काय

             सूर्य तळपतील, चंद्र झळकतील

              तारे आपला क्रम आचरतील

             मी मी जाता राही काय अंतराय "

हे घडतं सामान्य व्यक्तीच्या बाबतीत, मात्र काही असामान्य व्यक्ती गेल्यानंतरही आपली उणीव सोडून जातात. अशाच दुर्मिळ व असामान्य व्यक्तीपैकी एक नवाबी व्यक्तिमत्व म्हणजे माननीय स्वर्गवासी  एन.बी.शेख साहेब. माणूस किती वर्ष जगला याला महत्त्व नाही तर तो कसा जगला याला महत्व आहे यादृष्टीने साहेबांच्या जीवनाचा विचार केला तर लक्षात येते की हा चौकटीच्या पलीकडील वेगळा राजा होता. मळलेल्या वाटेने तर सगळेच जातात मात्र जो न मळलेल्या वाटेने जातो त्याच्या वाट्याला काटे कुठे अर्थातच संकटे येतात, अडचणी येतात या संकटावर, अडचणीवर मात करून जो आपले ध्येय सर करतो अशांचीच नोंद इतिहास घेत असतो. औसा तालुक्याच्या पावन भूमीवर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हिंदुस्तानी एज्युकेशन सोसायटी च्या रूपाने जो एक ज्ञानयज्ञ माननीय शेख साहेबांनी सुरू केला या शिक्षणाची गंगोत्री ग्रामीण भागातील तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचा केवळ संकल्प न करता तो त्यांनी पूर्णही केला हिंदुस्तानी एज्युकेशन सोसायटीच्या रोपट्याचे वटवृक्ष करण्याचे ध्येय साहेबांनी उराशी बाळगलेलं होतं म्हणतात ना....

थांबली ना धरती, थांबली ना धरा

या धुंद वादळास कोठला निवारा...

साहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य पायाला भिंगरी लागल्यागत घालवलं. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक  विद्यालय,महाविद्यालय आय.टी.आय., एम. सी. व्ही. सी. पॉलिटेक्निक,डी.एड.,बी.एड. मराठी उर्दू माध्यम अशा अनेक शाखांनी हे वटवृक्ष साहेबांनी उभं केलं. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षण तसेच इतर व्यवसायिक शिक्षणाची सोय याच ठिकाणी व्हावी म्हणून साहेबांनी दिवस-रात्र कष्ट करून ह्या सगळ्या सोयीसुविधा औसा आणि परिसरात विद्यार्थ्यांना निर्माण करून दिल्या. नाज अध्यापक विद्यालय जेव्हा पुन्हा नव्याने सुरू झाले तेव्हा साहेब स्वतःच्या शिक्षकी पेशातून औपचारिक रित्या सेवानिवृत्त झाले होते वास्तविक पाहता सेवा निवृत्ती नंतरचं वय हे विश्रांतीचं असतं आपलं कुटुंब सांभाळण्याचा असतं  मात्र साहेबांचे कुटुंब हे विश्वची माझे घर ऐसी मति जयाची स्थिर याप्रमाणे होती त्यांचं कुटुंब म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानी परिवार होता म्हणूनच वयाच्या साठोत्तरी नंतरही साहेबांनी या अध्यापक विद्यालयाची सुरुवातीची दोन वर्ष पायाभरणी केली ते स्वतः जातीने या ठिकाणी अध्यापनाचे कार्य करत होते. त्यांची ही पायाभरणी आमच्यासाठी एक मैलाचा दगड ठरली कारण साहेबांनी स्वतः वर्गात उभे राहून दोन-दोन तास सलग अध्यापन केले नुसते अध्यापन नाही तर त्या दोन तासांमध्ये त्यांनी आपल्या आयुष्याची सर्व अनुभव विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सांगितले. आयुर्वेदिक औषध जेवढे जुने असेल तेवढे त्याचे परिणाम हे चांगले आणि कायमस्वरूपी असतात असेच साहेबांच्या सेवाकाळातील सर्व अनुभवांचे आयुर्वेद साहेबांनी आम्हाला या दोन-तीन वर्षाच्या कालावधीमध्ये आम्हाला पाजले आणि त्याचाच परिणाम म्हणून आज औसा शहर व तालुक्यातील इतर विद्यालये विद्यार्थी संख्येअभावी बंद पडलेली असताना साहेबांची डीएड आणि बीएड महाविद्यालये आजही अशा प्रतिकूल परिस्थितीतही नेटाने उभी आहेत. साहेब सांगायचे की सुरुवातीला मी एकटाच होतो कोणीही सोबत नव्हते पण हरलो नाही, खचलो नाही, ही दमलो हि नाही.

             " चाल चाल अंधाराची वाट एकटाची

             पाहशील कुठवर तरुणा वाट प्रकाशाची " म्हणून चालत राहिलो कारण ध्येयाचा ध्यास घेतला की कामाचा त्रास वाटत नाही म्हणून चालत गेलो, संकटे झेलीत गेलो, दुखाना मागे लोटत गेलो. प्रसंगी काहींनी पायात साप सोडण्याचा प्रयत्न केला पण घाबरलो नाही कारण मी रस्त्याकडे पाहून प्रवास करत नव्हतो तर माझ्या ध्येयाकडेकडे पाहून प्रवास करत होतो मला जाणीव होती की.    

             प्रवासी मी दिगंताचा

             युगे युगे माझी वाट

              मज चालायचे असो

              सुखदुःख माळ घाट.

      म्हणून चालत गेलो. त्याचाच परिणाम म्हणून आज हिंदुस्तानी एज्युकेशन सोसायटीचे हे वटवृक्ष तुमच्यासमोर उभे आहे. एक सामान्य शिक्षक काय करू शकतो याचे जिवंत उदाहरण तुमच्या समोर आहे. रक्तदान, नेत्रदान आणि अवयव दान यापेक्षाही ज्ञानदान हे पवित्र दान आहे कारण ज्ञानदान  एक नव्हे दोन नव्हे किंवा तीन नव्हे तर पिढ्यानपिढ्या घडत असतात म्हणून तुम्हीही चांगले शिक्षक व्हा या संस्थेचे, या भूमीचे आणि या देशाचे नाव उज्वल करा. असे साहेब पोटतिडकीने सांगायचे. खरंतर आम्ही सर्व खूप सुदैवी आहोत कारण आम्हाला या "नवाब " नावाच्या अनुभवाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठाच्या सावलीत वावरत आलं, या ज्ञान कैवल्याचं ज्ञानतीर्थ आम्हाला चातक चोंचीने टिपता आलं. आम्ही कालपर्यंत मोठी माणसं इतिहासातच वाचत आलो होतो मात्र इथे इतिहास घडवणाऱ्या नवाबाचं चाकर होता आलं हे आम्हा सर्वांचं सुदैव आहे. मराठवाड्याच्या शैक्षणिक इतिहासात हिंदुस्तानी एज्युकेशन सोसायटीचे नाव सुवर्ण अक्षरात लिहले जावे, मा. एन.बी. शैख साहेबांचे  नाव घेतल्याशिवाय मराठवाड्याचा शैक्षणिक इतिहासच पूर्ण होऊ नये असं एक अद्वितीय कार्य साहेबांनी केलं. यासाठी साहेबांना कोणते राजकीय आर्थिक किंवा सामाजिक पाठबळ नव्हते जे काम केले ते स्वतःच्या हिंमतीवर ,ताकदीवर, परिश्रमावर . यासाठी तळागाळातील, गोरगरीब जनतेचा आशीर्वाद आणि दुवा मात्र त्यांना नक्की होता कारण त्यांनी अशा कित्येक लोकांचे संसार उभे केले होते.गरिब होतकरू विद्यार्थ्यांचे त्यांनी शैक्षणिक शुल्क माफ केले तर काहिंचे लग्नही लाऊन दिले. बहुतांच्या कामास  यावे,बहुतांच्या सुखी सुखावे याचे व्रत साहेबांनी घेतले होते, म्हणूनचं साहेबांनी शैक्षणिक क्षेत्राबरोबर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही आपले नवाबी पण दिमाखात गाजवलं.म्हणतात ना पाण्यात भिजलं कि फक्त कपडे ओले होतात अन् घामात भिजलं कि आत्मा ओला होतो आणि अशीच माणसं इतिहास घडवतात. साहेबांनी असाच इतिहास घडवला. खर तर लोक म्हणतात की माणूस जन्मतः काही घेऊन येत नाही आणि मेल्यानंतरही काही घेऊन जात नाही मात्र या कर्मवीराने या लोक समजुतीला तिलांजली दिली, लोकांच्या डोळ्यात एक कर्तुत्वाचं अंजन घातलं. ज्यांचं संपूर्ण आयुष्यच एक दीपस्तंभासारखे होतं त्यांचा मृत्यूही जाताना सर्वांना आदर्शाचा सरिपाठ देऊन गेला. जणू त्यांना सांगायचं होतं की या जन्म आणि मृत्यूच्या मध्ये जी जिंदगी चार दिन की आहे  यात चिरकाल टिकणारं आणि मृत्यू सोबत घेऊन जाता येणारे कार्य मनुष्याने जर ठरवले तर ते करता येते. जो स्वतःसाठी जगतो तो मरतो, पण जो दुसऱ्या साठी जगतो तू जिवंत राहतो म्हणून माणसाला मेल्यानंतर ही काहीकाळ जगता आलं पाहिजे. साहेबांनी चार डिसेंबर २०१७ रोजी स्वर्गाचे नागरिकत्व पत्करले. साहेब जरी नसले तरी त्यांनी केलेले कार्य आमच्यासाठी  एका होकायंत्राप्रमाणे सदैव मार्गदर्शक व प्रेरणादायी राहिल यात शंका नाही. 

प्रा. शेख ए. वाय. औसा

Post a Comment

0 Comments