विश्वनाथ मठपती यांना डीआरसीचा समर्पण पुरस्कार प्रदान
औराद शहाजनी:( प्रतिनिधी/शिवाजी निरमनाळे) निलंगा तालुक्यातील तगरखेडा येथील कृषी अधिकारी विश्वनाथ मठपती (स्वामी) यांच्या 80 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या जीवन कार्याचा गौरव म्हणून डीआरसी औराद शहाजानीच्या वतीने त्यांना अत्यंत प्रतिष्ठेचा समर्पण पुरस्कार बहाल करताना उपस्थित तगरखेडकर भारावून गेले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश स्वामी, सत्कारमूर्ती विश्वनाथ मठपती, प्रमुख अतिथी डॉ. प्रकाशसिंह कच्छवा,दत्ता पाटील, राजेंद्र बिराजदार, संगमनाथ उडबळे, विजयकुमार रावजादे, शंकर कल्याणे, महेबूब पठाण, प्रताप कांबळे, गावकऱ्यांच्यावतीने वैजाप्पा वलांडे, पांडुरंग थेटे, रमेश थेटे लक्ष्मण कांबळे या साऱ्यांची उपस्थित होती. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. गावातील अर्थक्रांती महिला बचत गटाच्यावतीने सौ. चंद्रकला मठपती, हारुबाई परीट यांनी सर्व मान्यवरांचे शाल,पुष्पहाराने स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डीआरसीच्या वतीने आदर्श शिक्षक विजयकुमार रावजादे यांनी केले. लोकसहभागातून ग्रामीण लोकांसाठी सर्व स्तरातील माणसांना तंत्रज्ञानाशी जोडून ठेवण्याचे महत्कार्य ही संस्था करते. या संस्थेने दुर्लक्षित असलेल्या अनेक सन्माननीय व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना सन्मानित करण्याचे मौलिक कार्य केले आहे. तंत्रज्ञानाची आवड असलेला कोणीही व्यक्ती याचा लाभ घेऊ शकतो. असे प्रतिपादन त्यांनी केले. कॄषिनिष्ठ जाणिवा यावर आपला शोध प्रबंध सादर करणारे शंकर कल्याणे यांनी त्यांचे चारित्र्य व कार्य-कर्तृत्व आम्हा तगरखेडकरांना नेहमीच आदर्श राहिले आहे. त्यांचा खळाळता उत्साह आमच्यासाठी सतत प्रेरणादायी आहे, असे मनोगत व्यक्त केले. पाणी बाबा संगमनाथ उडबळे सरांनी नैतिक मूल्याची गोष्ट सांगून सर्वांना प्रभावित केले. विश्वनाथ मठपती साहेबांची जीवनशैली ही आमच्यासाठी आदर्शवत आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. मॅक्स न्यूयॉर्क इन्शुरन्स कंपनीचे विकास अधिकारी राजेंद्र बिराजदार यांनी समस्त गावकऱ्यांच्या वतीने त्यांच्या भावी आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. आजही या वयात तरुणांना लाजवेल अशा प्रकारचा त्यांचा उत्साह निश्चितच आम्हा- तुम्हाला चकीत करणार आहे, असे मत व्यक्त केले. त्यांनी अनेक शेतकऱ्यांचे आयुष्य समृद्ध केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. विश्वनाथ मठपती यांचे चिरंजीव राजू मठपती यांनी आमच्या वडिलांचे अनेक सत्कार सोहळे झाले; पणअशा प्रकारचा गौरव हा आयुष्यातला सर्वश्रेष्ठ गौरव आहे, अशा प्रकारचे भावपुर्ण उद्गार काढून त्यांनी डीआरसीचे आभार मानले. आर्य समाज औराद शहाजानीचे मंत्री प्रकाशसिंह कच्छवा यांनी आरोग्य संपदा ही जीवनातील सर्वात महत्वाची संपदा आहे. हसत खेळत जीवन जगणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. आज प्रत्येक माणूस भौतिक सुखाच्या पाठीमागे लागलेला आहे. या धकाधकीच्या जीवनात तो आपले आरोग्य गमावून बसत आहे, अशा परिस्थितीमध्ये विश्वनाथ मठपती यांचा आदर्श निश्चितच प्रेरणा देणारा आहे, अशाप्रकारचे मत त्यांनी व्यक्त केले. प्रमुख अतिथी म्हणून बोलताना अमेरिकास्थित हलगरचे दत्ता पाटील यांनी मा. विश्वनाथ मठपती साहेबांच्या एकूण कार्य कर्तॄत्वाचा गौरव केला. अशा प्रकारची आदर्श माणसे समाजाला चांगली दिशा देऊ शकतात. अशा माणसांच्या कार्यकर्तृत्वामुळेच येणाऱ्या नव्या पिढीला प्रेरणा मिळत असते. त्यांनी घेतलेल्या खडतर शिक्षणावर त्यांनी भाष्य केले. शिक्षणाशिवाय आणि चांगल्या सुसंस्काराशिवाय चांगला नागरिक घडू शकत नाही. कुठलेही चांगले काम करताना अनेक संकटे आपल्या समोर येत असतात. अशी भावना त्यांनी शुभेच्छा देताना व्यक्त केली. डीआरसीच्या समर्पण पुरस्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती विश्वनाथ मठपती यांनी माझ्यासारख्या सामान्य माणसाला डीआरसीचा अत्यंत सन्मानाचा पुरस्कार देऊन गौरव केला त्याबद्दल मी त्यांची कॄतज्ञता व्यक्त करतो. माझे वडील भिक्षा मागून कुटुंबाची उपजीविका चालवत होते. अनेक भाषा माझ्या वडिलांनी शिकून घेतल्या होत्या. शिक्षण नसलेल्या माझ्या वडिलांना शिक्षणाची खूप जाण होती. त्यांच्यामुळेच आम्ही एवढे शिक्षण घेऊ शकलो. आमच्यासाठी आईने घेतलेले कष्ट आम्ही कधीही विसरू शकत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मिलिंद महाविद्यालयात शिकत असतानाच मला त्याकाळी नोकरी चालून आली, हे आमचे भाग्यच म्हणावे लागेल. आयुष्यभर मी प्रामाणिकपणे नोकरी केली. पैशाचा कसलाही हव्यास कधीच केला नाही. माझ्या नोकरीच्या कार्यकाळात मी एका रुपयाचाही कधी भ्रष्टाचार केला नाही. यामुळे मला खूप आत्मिक समाधान मिळत राहिले. मला नाटकाची आवड असल्यामुळे अनेक शेतकरी मी त्यामुळे जोडू शकलो. त्यांच्या बांधावर जाऊन त्यांना शेती कशी करावी हे मी समजावून सांगितले. शेतकऱ्यानेही मला भरभरून प्रेम दिले. माझ्या निरक्षर असलेल्या पत्नीने मला आयुष्यभर मौलिक साथ दिली, त्यामुळे माझे ऐंशी वर्षाचे आयुष्य सुखासमाधानात पूर्ण होऊ शकले. माझ्यासारख्या व्यक्तीचा डीआरसीने जो गौरव केला त्याबद्दल मी अंतःकरणापासून कृतज्ञता व्यक्त करतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. लोकसहभागातून चालणाऱ्या डीआरसीला माझ्यावतीने पाच हजार रुपयांची देणगी मी देत आहे. कृपया त्यांनी स्वीकारावे अशी विनंतीही त्यांनी केली. आपल्या आयुष्यातील जमा झालेली अर्थिक पुंजी त्यांनी आपल्या कुटुंबातील मुले, सुना यांना वाटून देण्याची घोषणा हा या कार्यक्रमातला सर्वात आगळावेगळा विषय ठरला. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना आदर्श सरपंच प्रकाश स्वामी यांनी गावकऱ्यांच्या वतीने त्यांच्या दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतांना आदर्श चारित्र्य, निष्कलंक कार्य, वेळेचे काटेकोर पालन, शेती, मातीवरची शेतकर्याबद्दलची निष्ठा या साऱ्या गोष्टींमुळे ते अनेकांच्या हृदयात घर करून राहिले आहेत. अशा एका मोठ्या माणसाचा सत्कार गावात होत आहे, याचा आम्हाला मनस्वी आनंद होतो आहे. अशा शब्दांमध्ये त्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. या कार्यक्रमाचे आभार सौ.भाग्यश्री शरद मठपती यांनी मांडले. गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.
0 Comments