आमदार बाबासाहेब पाटील यांचे अहमदपूर-चाकूर तालुक्यातील जनतेला जाहीर आवाहन
चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) प्रशासनाणे परवानगी दिल्याने आजपासून बाजारपेठा, छोटे-मोठे स्टॉल सुरू होतायेत गेल्या २२।दिवसापासून रखडलेली खरेदी करण्याचा प्लॅन आपल्यापैकी अनेकांनी केलाही असेल. पण याचा अर्थ आज पासूनच खरेदीसाठी झुंबड करायची असं नाही. यापुढं आपले सगळे व्यवहार सुरळीतपणे पूर्वपदावर आणण्याचा सरकारचा व प्रशासन यांचा प्रयत्न आहे. त्यामुळं सगळ्यांनीच एकाच वेळी गर्दी करण्याची आवश्यकता नाही. तसंच अधाशासारखी एकाच वेळी खरेदी करण्याचीही गरज नाही. तुम्हाला सगळ्या वस्तू यापुढं नियमित मिळणार आहेत. जीवनावश्यक वस्तू खरेदी केली पाहीजे, पण अनावश्यक खरेदीसाठी विनाकारण गर्दी करण्याची काहीच गरज नाही. बाजारपेठांमधील दुकाने, स्टॉल सुरू करण्यास परवानगी देताना राज्य सरकारने काही नियम व अटी घालून दिल्या आहेत. मास्क लावणं, सॅनिटायजेशन आणि शारीरिक अंतर राखणं हे नियम तर प्रत्येकाला पाळावेच लागणार आहेत. हे नियम म्हणजे आपल्यावर घातलेले काही जाचक निर्बंध नाहीत तर आपली स्वत:ची, आपल्या कुटुंबाची आणि पर्यायाने समाजाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठीच तयार केलेले नियम आहेत. त्यामुळं नियमांचं काटेकोर पालन करुन सरकारला सहकार्य करण्याची आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आणि जबाबदारी आहे.मला काही होत नाही, या भ्रमात असणाऱ्यांनी स्वतःच्या कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींचा, लहान मुलांचा विचार करून हे नियम पाळावेत. असे नियम पाळूनच आपण धारावीसारख्या जगातील सर्वांत मोठ्या झोपडपट्टी भागातील कोरोनाचा विळखा आपण सैल करू शकलो. म्हणून तर जगाने आपलं कौतुक करत पाठ थोपटली. जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) धारावी पॅटर्नचा उल्लेख करत आपलं कौतुक केलं. आता हाच आदर्श डोळ्यांपुढं ठेवून आपल्याला संपूर्ण अहमदपूर चाकूर मतदारसंघात काळजी घ्यायचीय,कोरोना मुक्तीकडे वाटचाल करायचीय.आपल्या रोजच्या व्यवहारांच्या माध्यमातून आपली अर्थव्यवस्था हळूहळू रुळावर येतेय ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. मात्र या आनंदात कसलंही विरजण पडणार नाही याची आपण काळजी घेतली तरच कोरोनाला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही. सर्वांनी मास्क, सॅनिटायजर आणि शारीरिक अंतर राखायचं आहे. जो नियम पाळत नसेल त्यांना नियम पाळण्यास भाग पाडायाचंय. शासन, प्रशासनाला सहकार्य करायचंय, मग पाहा तो दिवस दूर नाही, ज्यादिवशी आपला मतदारसंघ महाराष्ट्रत पहिलं कोरोनामुक्त तालुका बनलेलं असेल. मला विश्वास आहे हे ध्येय्य आपण नक्की गाठू. तुम्ही सर्वांनी सामुहिक कर्तव्य समजून, स्वत:ची, कुटुंबियांची, समाजाच्या सुरक्षेची काळजी घेतली तर मतदारसंघ कोरोनामुक्त करणं अवघड नाही. चला सर्वजण एकजुटीनं सामुहिक शिस्त पाळूया अन कोरोना विरुद्धचं युद्ध जिंकूया असे आवाहन आमदार बाबासाहेब पाटील यांनी जनतेला केले आहे.
0 Comments