लातूर:(प्रतिनिधी) दि.२ - कोरोना विषाणूचा (कोव्हीड-१९) प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करुन खंड २, ३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. याबाबतची नियमावलीही तयार करण्यात आली असून स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात आली आहे. जिल्हयाच्या कार्यक्षेत्रात कोव्हीड-१९ चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.राज्यात नियम व अटीच्या अधीन राहून व्यवसाय सुरु करण्यासाठी राज्य शासनाने मिशन बिगिन अगेन व्दारे लॉकडाऊनच्या काही नियमांना शिथिलता देऊन माहे जूनपासून अनलॉक टप्पा सुरु केला आहे. कोरोनाचा (कोव्हीड-१९) सर्वाधिक धोका पन्नास वर्षापुढील ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला व बालकांना आहे. मात्र अनेकजण काळजी न घेता व्यवसाय करीत असून यात साठ वर्षापुढील व्यक्ती स्वत:चा जीव धोक्यात घालून व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. यात बहुतांश विविध व्यवसायांतील कुटुंबातील व्यक्ती असल्याचे दिसून येत आहे.ज्येष्ठ नागरिक आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी जात असून, त्यांचा व्यवसायाच्या निमित्ताने वावर वाढला असून याचा फटका काही ज्येष्ठ व्यापाऱ्यांना बसला आहे. काहींना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्हयात आतापर्यंत मृत्यू पावलेल्या व्यक्तींपैकी ज्येष्ठ व्यक्तीच कोव्हीड-१९ मुळे सर्वाधिक मयत झाले आहेत. यामुळे प्रशासनाने ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची परिपूर्ण काळजी घेण्यासाठी अभियांन हाती घेतले असताना, दुसरीकडे काही व्यावसायिक ज्येष्ठांच्या काळजीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. यामुळे जिल्हयात कोरोनामुळे मृत्यूंचे प्रमाण वाढत असून याला आवर घालण्यासाठी साठ वर्षापुढील व्यक्ती मालक किंवा नोकर म्हणून दुकानात दिसल्यास त्या आस्थापना / दुकान चालकाविरुध्द कारवाई करण्याची बाब जिल्हा प्राधिकरणाच्या विचारधीन होती.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे जी. श्रीकांत यांनी कोरोनाचा (कोव्हीड-१९) सर्वाधिक धोका पन्नास वर्षापुढील ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला व बालकांना असल्याने तसेच जिल्हयात आतापर्यंत मृत्यू पावलेल्या व्यक्तीपैकी ज्येष्ठ व्यक्तीच कोव्हीड-१९ मुळे सर्वाधिक मयत झाले असून जिल्हयात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत असून, याला आवर घालण्यासाठी साठ वर्षापुढील व्यक्ती, मालक किंवा नोकर म्हणून दुकानात दिसल्यास त्या आस्थापना / दुकाने लॉकडाऊन संपेपर्यंत बंद करण्याचे व त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश याव्दारे देत आहे. या आदेशाची अंमलबजावणी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने करणेस्तव आदेशित करण्यात येते. यात अत्यावश्यक सेवा म्हणून डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ यांना सुट राहील, याची नोंद ध्यावी, तथापि , जिल्हयातील सर्व नागरिकांनी स्वत:चे वय नमूद असलेले ओळखपत्र सोबत ठेवावे.
या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनिम, २००५ चे कलम ५१,५५ तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ अन्वये दिलेल्या तरतुदीनुसार भारतीय दंड संहिता, १८६० चे कलम १८८ नुसार तसेच महाराष्ट्र कोव्हीड-१९ उपाययोजना नियम, २०२० च्या तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी. हे आदेश दिनांक ६ जूलै २०२० पासून अंमलबजावणी करण्यात येत आहे असे ही आदेशात नमुद केले आहे.
0 Comments