अनलॉकनंतर लातूरचे पुन्हा लॉकडाउन कडे मार्गक्रमण
वाढत्या कोरोना रुग्णांमुळे जनतेत चिंतेचे वातावरण
देशासह राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची होत चाललेली विक्रमी वाढ यामुळे सर्वसामान्य जनतेसह, केंद्रशासन, राज्य यासोबतच स्थानिक प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली असून राज्यातील अनेक शहरात पुन्हा एकदा लॉकडाउन घोषित करून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. लातूर शहर आणि जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्हा प्रशासन लवकरच लॉकडाउनचा निर्णय घेईल असा विश्वास जनतेतून व्यक्त केला जात आहे.
लॉकडाउन हा कायमस्वरूपी पर्याय असू शकत नाही हे सत्य असले तरी सर्वसामान्य जनतेच्या जीविताची त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे शासनाचे मूलभूत कर्तव्य आहे हे ही तितकेच खरे. लॉकडाउन काळात कोरोना संसर्गापासून जनतेला वाचविण्यासाठी, सुविधा पुरविण्यासाठी सरकारी यंत्रणा, पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग, स्थानिक संस्था, सामाजिक संघटना यांनी केलेले प्रयत्न नक्कीच प्रशंसनीय आहेत. मात्र मिशन बिगीन अगेन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, रुग्णांची होत असलेली विक्रमी वाढ यामुळे सर्वसामान्य जनतेसह प्रशासनही चिंतातुर झाले आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट होत असून अपुरी संसाधने, मनुष्यबळाचा अभाव यामुळे कोरोनाचा मुकाबला करताना प्रशासनास अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
प्रशासनासोबतच आता तुम्हा आम्हालाही या लढ्यात सक्रिय होणे गरजेचे बनले आहे. या विषाणूला फक्त तुम्ही म्हणजे तुम्हीच हरवू शकता ही खूणगाठ बांधली पाहिजे. सामाजिक जबाबदारी म्हणून स्वतःच शिस्त लावून घ्यावी लागेल. शरीराने दूर राहूनच एका सामाजिक विचाराने एकत्र होऊन कोरोनाशी लढू या. सामाजिक अंतर, मास्क, स्वच्छता या अत्यावश्यक आयुधांची सवय लावून घेतली पाहिजे.
रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर आपणास सुविधा आणि उपचार पुरविण्यासाठी प्रशासनास मोठी कसरत करावी लागेल. लॉकडाउन पर्याय नसला तरी वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन कधीही कठोर लॉकडाउनची अंमलबजावणी करू शकते. म्हणून आता सर्वांनी सावधगिरी बाळगत स्वतः या कोरोना लढ्यात उतरून प्रशासनास सहकार्य करावे एवढीच अपेक्षा.
सतीश तांदळे
पत्रकार
लातूर
0 Comments