स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यांना पल्स ऑक्सीमीटर, थर्मल स्कॅनर मशिनचे वितरण
लातूर (प्रतिनिधी) जिल्हयातील प्रत्येक नागरिकांनी कोरोना (कोव्हीड-१९) चा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवून कोरोना संसर्गापासून दूर राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले.येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हयातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे सर्व निर्वाचित व नामनिर्देशित सदस्यांना प्रत्येकी एक पल्स ऑक्सीमीटर व एक थर्मल स्कॅनर मशिन प्रातिनिधीक स्वरुपात वितरण जिल्हाधिकारी श्रीकांत यांच्या हस्ते झाले त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महानगर पालिकेचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, महानगर पालिका आयुक्त देविदास टेकाळे, नगर परिषद जिल्हा प्रशासन अधिकारी सतीश शिवणे उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणाले की, जिल्हयात कोरोना साथरोगाचा प्रार्दूभाव वाढत आहे. जिल्हयातील प्रत्येक नागरिकांनी घाबरुन न जाता आपली इच्छाशक्ती तसेच प्रतिकारशक्ती वाढवून कोरोनाच्या संसर्गापासून दूर राहून कोरोना रोगावर मात करावी असे आवाहन त्यांनी केले. जिल्हयात प्रत्येक मतदार संघाची मतदार यादी तपासून मतदार यादीतील ५० वर्षापेक्षा जास्त वयोगटातील प्रत्येक व्यक्तिची तपासणी करण्यात येत आहे. यासाठी जिल्हाभरात अभियान राबविण्यात येत आहे. त्यास प्रत्येक कुटूंबांनी प्रतिसाद दयावा व आपल्या कुटुंबातील व्यक्तिंची तपासणी करुन घ्यावी. यासाठी मतदार संघातील प्रत्येक बुथ वरील बीएलओ ,आशा वर्कर व अँन्टी कोरोना फोर्सचे प्रतिनिधी मदत करतील. तसेच ८ ते १० बुथ लेवलवर नायब तहसिलदार पदाचे अधिकारी नियुक्त करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले.यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार व जिल्हयातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निर्वाचित व नामनिर्देशित सदस्यांना प्रत्येकी एक पल्स ऑक्सीमिटर व थर्मल स्कॅनर मशिनचे प्रातिनिधीक स्वरुपात वितरण करण्यात आले असून या मशिनव्दारे प्रत्येक सदस्यांनी आपल्या परिसरातील नागरिकांची तपासणी करुन घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.या कार्यक्रमास महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती ॲड. दिपक मठपती, परिवहन सभापती मंगेश बिराजदार, विरोधी पक्ष नेता दिपक सुळ, सभागृह नेता ॲड. शैलेश गोजमगुंडे, औसा नगर परिषदेचे अध्यक्ष अफसर शेख , निलंगा नगर परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, महानगरपालिका सदस्य राजासाब मनियार उपस्थित होते.प्रारंभी नगर परिषद प्रशासन विभागाचे अधिकारी सतीश शिवणे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक करुन शेवटी कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले.
0 Comments