मुख्य रस्त्याच्या तिसऱ्या टप्प्याचे भीजत घोंगडे
गरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे नागरिक त्रस्त
औसा:(प्रतिनिधी/औसा) शहरातील मुख्य रस्त्याच्या तिसऱ्या टप्प्यातील रस्ता रुंदीकरणाचे घोंगडे भीजत पडले असून नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे व्यापारी आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. लातूर वेस हनुमान मंदिर ते जामा मशिद पर्यंतच्या तिसऱ्या टप्प्यातील रस्ता रुंदीकरणाला पालिकेस मुहूर्त मिळेनासा झाला आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून रस्ता दुरूस्तीच्या नावाखाली मुरूम टाकल्याने वाहने जाताना खडे उडत असून रस्त्यावरील खड्ड्यात मृग नक्षत्राच्या पावसाने पाणी साचले आहे. खड्ड्यातील पाण्याचे शिंतोडे वाहन जाताना पायी जाणाऱ्यांच्या अंगावर उडत आहेत. तिसऱ्या टप्प्याच्या रस्ता रुंदीकरणाचे काम मंजूर झाले असून वर्क ऑर्डर काढली असल्याचे नगराध्यक्ष सांगत आहेत. मग प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी करणार ? अशी जनतेत चर्चा सुरू आहे. भूसंपादन प्रक्रियेत या रस्त्याचे काम अडकले असून दोन तीन वेळा रस्त्याच्या रुंदीकरणाचे भूमिपूजन करूनही नगरपालिका प्रशासन व कौन्सिलच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांनाच त्रास सहन करावा लागत आहे. तिसऱ्या टप्प्याचा रस्ता रुंदीकरणासाठी या कामी राजकारण न करता शहराच्या विकासासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन सामंजस्याने मार्ग काढणे आवश्यक आहे. औसा शहराच्या प्रवेशद्वारापासून ऐतिहासिक मशिदचा रस्ता कुचकामी ठरला असून या रस्त्यावर जागोजागी वाहतुकीची कोंडी होत आहे. औसा शहरातील नागरिकांनीही भूसंपादनच्या कामी सहकार्य करून शहराच्या विकासाला साथ देणे गरजेचे आहे. नगराध्यक्षासह सत्ताधारी पक्षाचे स्पष्ट बहुमत असूनही विकासाला साथ देणे गरजेचे आहे. पालिका तिसऱ्या टप्प्याच्य रस्ता रुंदीकरणासाठी उदासीनतेची भूमिका घेताना दिसत आहे. पालिकेचे राजकारण आणि त्रास मात्र सर्वसामान्य जनतेला सहन करण्याची पाळी आली असून, रहदारीसाठी हा रस्ता अत्यंत दयनीय झाल्याने जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे.
0 Comments