आत्महत्या एक निंदनीय अपराध - मुजाहिद शेख
सुशांतच्या जाण्याचं दुःख आहेच, परंतु त्याने पत्करलेल्या मार्गाचा राग त्याहून जास्त आहे. निर्विवाद आत्महत्या एक निंदनीय अपराध आहे. ही वेळ सुशांतच्या मृत्यूवर दुःख व्यक्त करण्याची नव्हे तर आत्महत्येची निंदा करण्याची आहे. आत्महत्या आता मृत्यूसाठी एक सोपा पर्याय म्हणून समाजमान्यता प्राप्त करत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगभरात दरवर्षी ८ लाख लोक आत्महत्या करतात. याचा अर्थ जगात दर ४० सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करून त्याचा जीवनप्रवास कायमचा थांबवत असते. लक्षात घ्या, हे आकडे आत्महत्यांच्या प्रयत्नांचे नाहीत, तर आत्महत्यांचे आहेत. आत्महत्येसाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची संख्या याहून कित्येक पटीने जास्त आहे. यामुळे आत्महत्या मृत्यूचे जगातील तिसरे सर्वात मोठे कारण आहे. त्याहून भयंकर बाब म्हणजे सर्वात जास्त आत्महत्या १५ ते २९ या वयोगटात होत असतात. म्हणजे ज्या वयोगटावर जगाचे भविष्य निर्भर आहे, त्याच वयोगटात आत्महत्येचा दर सर्वाधिक आहे. देशातील आत्महत्यांचे प्रमाण भारताच्या बाबतीत ही समस्या आणखीन जास्त गंभीर रूप धारण करते. जगातील एकूण आत्महत्यांपैकी १० टक्के आत्महत्या भारतात होत असतात. म्हणजे आपल्याकडे दरवर्षी सरासरी ८० हजार आत्महत्या होतात. यामध्ये १९ ते २४ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या हेलावून टाकणारी आहे. ११ जाने २०२० च्या Times of India नुसार २००९ ते २०१८ पर्यंत दहा वर्षात एकूण ८१,७५८ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. देशात दररोज २८ विद्यार्थी आत्महत्या करतात.२०१८ मध्ये आत्महत्यांनी ‘न भूतो’ चा उच्चांक गाठला. या एका वर्षात देशात १ लाख ३० हजार जणांनी आत्महत्या केली. यामध्ये सर्वाधिक संख्या तरुणांची होती. विशेष म्हणजे सर्वात जास्त आत्महत्या पुरोगामी आणि प्रगतीशील महाराष्ट्रातून होत्या. दुर्दैवाने, आत्महत्यांच्या बाबतीत महाराष्ट्र देशात मागील अनेक वर्षांपासून अग्रेसर राज्य ठरले आहे.कोविड – १९ मुळे देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले. लॉकडाऊन काळात २२ मार्च ते २ मे पर्यंत या ४५ दिवसांत देशभरात ३३८ आत्महत्यांची नोंद झाली. यातील जितक्या आत्महत्या कनिष्ठ आणि निम्न वर्गीय होत्या तितक्याच किंबहुना त्याहून जास्त आत्महत्या उच्च वर्गीयांच्या होत्या. मागील काही वर्षात उच्चभ्रू उच्च वर्गीयांच्या आत्महत्यांच्या प्रकरणांत वाढ झाली आहे. सुशांतचे प्रकरण यापैकीच एक आहे. सुशांतचे वय अवघे ३४ वर्षांचे. त्याने अजून आयुष्याचा खेळला सुरुवातही केली नव्हती की त्याला exit घ्यावी लागली. ती exit कोणत्या कारणाने घ्यावी लागली, यापेक्षा त्यांनी exit का घेतली हे महत्वाचे आहे. मुळात या जगातील समस्यांना तोंड देण्याचे सामर्थ्य युवक का गमावतो आहे? त्याने खेडाळूवृत्तीने या समस्यांचा सामना का करत नाही? खेळ सुरु होताच परिस्थितीतला शरण का जातो? यातून आत्महत्येसारखा टोकाचा निंदनीय, तिरस्कृत आणि भ्याड मार्ग का पत्करतो? आत्महत्यांचे कारण आणि धर्म आत्महत्यांची शेकडो कारणे असतील, हजारो कदाचित, परंतु मूळ कारण एकच आहे. ते म्हणजे – या सर्व कारणांची परिणीती जेव्हा नैराश्यामध्ये होते, तेव्हा आत्महत्येचा भ्याड मार्ग सुचतो. मुळात नैराश्याची भावनाच आत्महत्येची जननी आहे. लोकांना आत्महत्यांपासून परावृत्त करणाऱ्या संस्था आणि मानसोपचार तज्ञ याबाबतीत सहमत आहेत की नैराश्याच्या भावनेतून आत्महत्येचा विचार जन्म घेतो. तेव्हा लोकांना नैराश्यातून बाहेर काढून आशेचा किरण दाखविण्यासाठी या संस्थांना आणि मानसोपचार तज्ञांना धर्म श्रद्धेच्या विविध रूपांचा आसरा घ्यावा लागतो. धर्मापासून फारकत माणसाला प्रतिकूल परिस्थितीत नैराश्याच्या खाईत खचते. याउलट जीवनात धर्माचे स्थान अढळ असेल तर अत्यंत टोकाची प्रतिकूल परिस्थितीही माणसाला एक इंचही हटवू शकत नाहीी .आत्महत्या आणि मुस्लिम समाज जगात आत्महत्यांच्या प्रकरणांच्या बाबतीत जागतिक मुस्लिम समाज अगदी विरोधी टोकावर उभा आहे. केवळ देशातच नव्हे तर जगात मुस्लिम समाजात आत्महत्यांचे प्रमाण नगण्य आहे. अत्यंत टोकाच्या प्रतिकूल परिस्थितीतही हा समाज तग धरून, पाय रोवून उभा आहे. देशात विद्यार्थी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये मुस्लिम विद्यार्थी आणि शेतकऱ्यांचे प्रमाण नगण्य आहे. अंतरराष्ट्रीय राजकारणाला बळी पडून अनेक मुस्लिम राष्ट्रे उध्वस्त झाली असताना त्या देशातील नागरिक कसल्याही नैराश्याविना आनंदाने जीवन जगत आहेत. World Happiness Index मध्ये मुस्लिम नागरिक इतर राष्ट्रांच्या आणि इतर नागरिकांच्या तुलनेत जास्त आनंदी असल्याची नोंद करण्यात आली आहे. National Center for Biotechnological Information तर्फे, एक सामाजिक संशोधन उपक्रम राबविण्यात आले होते. संशोधनाचा विषय होता Influence of Religion on Attitude Towards Suicide: An Indian Perspective. संशोधनाचा अहवाल म्हणतो की “आमच्या अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की मुस्लिमांमध्ये हिंदूंपेक्षा आत्मघातकी वागणूक तुलनात्मकदृष्ट्या नगण्य आहे. हिंदूंच्या तुलनेत मुसलमान आत्महत्येप्रती नकारात्मक विचार करतात.” आत्महत्या मुस्लिमांच्या दृष्टीकोनातून पळपुटेपणा आहे, भ्याड मार्ग आहे; निंदनीय आणि तिरस्कृत कृत्य आहे. याचे कारण इस्लामने आत्महत्येला निषिद्ध घोषित केले आहे, हराम ठरवले आहे. आपल्या अनुयायांच्या मनावर, त्यांच्या मानसशास्त्रवर इस्लामचा मोठा प्रभाव आहे. या प्रभावातून मुस्लिम मन साकार झाले आहे. मुस्लिम मनाच्या विविध पैलूंची चर्चा करण्याची ही वेळ नव्हे, परंतु मुस्लिम मनातील अत्यंत महत्वाचा भाग ‘सकारात्मकता’ आहे. हजारो कत्तली, शेकडो नरसंहार, मुस्लिमांच्या सामाजिक विकासाप्रतीची शासकीय निष्क्रियता, मुस्लिम समाजाकडे पाहण्याचा एकांगी दृष्टीकोन आणि त्यातून विकसित होणारी पूर्वग्रहदुषित मानसिकता आणि वर्तणूक, मुस्लिम आणि इस्लामविरोधी दृष्टीकोन या सारख्या शेकडो घटनांचा मुस्लिम समाजावर काडीचाही नकारात्मक परिणाम होत नाही. अत्यंत टोकाच्या प्रतिकूल परिस्थितीतही हा समाज ‘धैर्याची’ साथ सोडत नाही की त्यांचे साहस खचत नाही. ‘अल्लाह सब ठीक कर देगा’ या आशावादासह हा समाज नेहमीच उठून उभा राहतो. याचे एकमेव कारण म्हणजे आत्महत्यासंदर्भात इस्लामने घडवलेले मन. आत्महत्या आणि धार्मिक प्रेरणा आत्महत्या थांबविण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे आशावाद. परंतु हा आशावाद जगाच्या भौतिक मांडणीतून येणार नाही, येतही नाही. हा आशावाद स्वयंस्फूर्त असायला हवा, आतून असायला हवा. मानवाचा आत्मा त्या आशावादाचा केंद्र असायला हवा. हा आशावाद केवळ अध्यात्मातून प्राप्त केला जाऊ शकतो. आपल्या आत्माला पालनकर्त्यापुढे शरण केल्याने प्राप्त केला जाऊ शकतो. हेच धर्माचे वास्तविक शक्तिस्थान आहे. तो माणसाला त्यांच्या आतून प्रेरणा देतो. बाह्य जग पूर्णपणे नष्ट झाले असले तरी तो माणसाच्या आत एक नवविश्व साकारण्याची अग्नी प्रज्वलित करीत असतो.
मुजाहिद शेख,उस्मानाबाद
0 Comments