सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण
बीड:(प्रतिनिधि) सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंडे यांच्या स्वीय सहायकासदेखील कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्री मंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत मुंडे सहभागी झाले होते. परळीत जगतकर गल्लीतील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह औरंगाबादेत ५ जून रोजी आढळून आली होती. त्यावेळी तिच्या कुटुंबियांच्या संपर्कात ना.धनंजय मुंडे आले होते. मात्र तेव्हा मुंडे यांचा समावेश हायरिस्क गटात न करता लो रिस्क गटात करण्यात आला होता. त्यामुळे त्यांचे स्वैब घेण्यात आले नव्हते. तर हायरिस्क गटातील लोकांचे स्वैब नमुने घेतले असता ते निगेटिव्ह आढळून आले होते. त्यानंतर सोमवारी मुंडे यांनी अंबाजोगाईत विषाणू निदान प्रयोग शाळेचे उदघाटन देखील केले होते. या विविध ठिकाणच्या सक्रिय सहभागामुळे मंत्री मुंडे यांना कोरोनाची लागण नेमकी कुठे झाली हे अद्याप स्पष्ट नाही. परंतु या प्रयोगशाळेच्या उदघाटनाला अनेकजण उपस्थित होते. या वृत्ताला बीडच्या आरोग्य प्रशासनाकडून दुजोरा मिळत नसला तरी मुंडे यांच्या निकटवर्तीयांनी याला दुजोरा दिला आहे. काहींनी फेसबुक, व्हाट्स अप स्टेटस ठेऊन साहेब तुम्ही लवकर बरे व्हा असे प्रार्थनावजा मजकूर लिहिले आहेत.ठाकरे सरकारमधील तिसऱ्या मंत्र्याला संसर्ग झाल्याची ही घटना आहे. याआधी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली होती. सुदैवाने या दोन्ही मंत्र्यांनी कोरोनावर मात केली.
0 Comments