Latest News

6/recent/ticker-posts

वंचितचे राज्यभर आंदोलन, निवेदनांचा पडला पाऊस

वंचितचे राज्यभर आंदोलन, निवेदनांचा पडला पाऊस



अकोला:(प्रतिनिधी) दि. १७ - राज्यात मागासवर्गीयांवरील हल्ल्यात प्रचंड वाढ झाली असून तपास यंत्रणा कुचकामी ठरल्या आहेत. कोणत्याही प्रकारची चौकशी होत नाही, कोणाला पकडले जात नाही, या सर्व प्रकारणांकडे दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न होत असून या झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी राज्यभर आंदोलने करण्यात येत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज सर्व जिल्हाधिकारी, प्रांत, तहसील, विभागीय अधिकारी यांना निवेदने देऊन या हल्ल्यांचा निषेध करण्यात आला. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली.राज्यात मागासवर्गीयांवर हल्ले असून नागपूर येथे अरविंद बनसोड तर पुणे येथे विराज जगताप या तरुणांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्याच बरोबर औरंगाबाद, जळगाव, रत्नागिरी, परभणी, नाशिक या जिल्ह्यांमध्ये मागासवर्गीयांवर हल्ले करण्यात आले. यातील काही प्रकरणात दिखाऊपणाची कारवाई करण्यात आली. अनेक ठिकाणी तर आरोपी पकडलेच गेले नाही. ज्यांना पकडले त्यांना सौम्या कलम लावल्याने ते जामिनावर बाहेर आले तर काही ठिकाणी पीडितांवरतीच गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे पोलिसांचे एक प्रकारे समर्थन मिळत असल्याने अशा गावगुंडांचे मनोबल वाढत आहे आणि त्यामुळेच अशा हल्ल्यांमध्ये वाढ होत आहे. कुंभार, पारधी, नाभिक, बौद्ध, मातंग या व इतर समाजाला लक्ष करून मारहाण केली जात आहे. त्याचा निषेध म्हणून आज राज्यभर निवेदने देऊन आंदोलने करण्यात आली असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली.हे सरकार जातीयवादी तर आहेतच मात्र आता धर्मवादी दिसायला लागले आहे. शासनाकडून आमची अपेक्षा आहे की पोलिसांना योग्य तो आदेश देऊन या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करण्यात यावी, जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली. ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख माया कांबळे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे ठाणे उपाध्यक्ष रुपेश उंबरे, प्रवीण गोसावी, वाशी नाका येथे ज्योती यादव, अनिल वाकोडे, सुरेश वाघमारे सुनीता डोळस तर पुणे येथे पी.टी. काळे, औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष अमित भुईगल, राजेंद्र पातोडे, सिद्धार्थ मोकल तसेच इतर जिल्हा, तालुका अधक्ष्यानी राज्यातील सर्व तालुका जिल्हा स्तरावर निवेदने देऊन या हल्ल्यांचा निषेध केला. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.


Post a Comment

0 Comments