बाभळगाव येथील कंन्टेमेन्ट झोनला पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांची भेट
लातूर:(प्रतिनिधी) बाभळगाव येथील रूग्णास कोविड-१९ ची लागण झाली असल्याचे निदान झाल्यानंतर ते राहत असलेला परीसर तातडीने सील करून कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे, राज्याचे वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी शुक्रवारी सकाळी लगेच त्या परीसराला भेट दिली. कोवीड-१९ साथीची इतरांना लागण होणार नाही याची काटेकोर दक्षता घेण्यात यावी, शिवाय या कंटेनमेंट झोन मधील रहिवाशी यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.बाभळगाव येथील एक रहिवासी कोवीड-१९ पॉझिटिव्ह असल्याने गुरुवारी रात्री लक्षात आले, त्यानंतर आरोग्य तसेच पोलीस यंत्रणेने शुक्रवारी सकाळी तो परिसर सील करून कंटेनमेंट झोन तयार केला आहे.राज्याचे वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी शुक्रवारी सकाळी या परिसराला भेट दिली. नागरिकांशी चर्चा करून धीर दिला, काळजी करण्याची गरज नसल्याचे सांगून दक्षता घेण्याच्या सुचना दिल्या, तेथे उपस्थित अधिकारीसह सर्वांना याठिकाणी कंटेनमेंट झोनच्या सर्व नियमांचे पालन करावे असे निर्देश दिले, हे करीत असताना या परिसरात राहणाऱ्या लोकांची गैरसोय होणार नाही याचीही काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. यावेळी उपविभागीय अधिकारी सुनील यादव, तहसीलदार स्वप्निल पवार, मंडळ अधिकारी कुलकर्णी, पोलीस निरीक्षक नंदकुमार पाटील, आरोग्य अधिकारी डॉ.सारडा, डॉ. माळी, सरपंच सतीश कुटवाडे, उपसरपंच अविनाश देशमुख ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments