तृतीयपंथीयांसाठी मोलाची कामगिरी करणार - दिशा शेख
मुंबई:(प्रतिनिधी) दि.११ - तृतीयपंथीयांच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक गोष्टींसाठी आपण काम करणार असून, भविष्यात अनेक जबाबदार्या पार पाडायच्या आहेत. त्यासाठी मी राज्य सरकारचे आभार मानते, अशा शब्दात तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळाच्या नवनियुक्त सदस्या दिशा पिंकी शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.राज्य सरकारने तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळाची घोषणा केली. त्याच्या सदस्यपदी दिशा पिंकी शेख यांची नियुक्ती केल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे राज्यभरातून दिशा शेख यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे. दिशा शेख सध्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या असून त्या देशातील पहिल्या तृतीयपंथी कवयित्री आहेत. अतिशय संघर्षमय जीवनातून वाटचाल करीत त्यांनी हे शिखर गाठले आहे. येवला येथे जन्मलेल्या दिशा शेख सध्या श्रीरामपूर अहमदनगर या ठिकाणी राहतात. आठवडा बाजारात पैसे कमविणे आणि कविता करणे हा त्यांच्या जीवनाचा दैनंदिन भाग होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या दिशा शेख खऱ्या अर्थाने शोषित, वंचितांना न्याय देण्यासाठी राजकारणाकडे वळल्या. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिशा शेख यांची नियुक्ती प्रवक्ते पदी केली. चांगल्या वक्त्या,अभ्यासु मार्गदर्शन करणाऱ्या दिशा शेख यांचा सामाजिक ओढा पाहता राज्य सरकारने तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळाच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती केली. भविष्यात आपण तृतीयपंथीयांसाठी आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक विषयांवर काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या मंडळावर गौरी सावंत, सलमा खान यांची देखील नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला शिकायला मिळेल,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.
0 Comments